---Advertisement---
जळगाव : अवैध वाळू वाहतूकदारांची दादागिरी वा मुजोरी सुरूच असल्याचे वारंवार समोर येत आहे. मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा प्रशासनास काही सापडलेला नाही. अशात पुन्हा वाळूमाफियांनी मंडळ अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भडगाव तालुक्यात पिंपळगाव थडीचे येथील मंडळ अधिकारी दिनेश लक्ष्मणराव येंडे हे रात्रीच्या गस्तीसाठी गिरणा नदीपात्रात गेले होते. दरम्यान अवैध वाळू उचल होत असल्याची कुणकुण मंडळ अधिकारी येंडे यांना लागल्याने पिंपळगाव थडीचे येथे मंगळवारी (१० जून) राजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूकविरोधी पथकासोबत गिरणा नदीपात्रात ते गेले. पिंपळगाव ते भडगाव रस्त्यावर, पीरबाबा दर्गा परिसरात मंडळ अधिकारी येंडे यांना अडवून, संशयित शिवबा राजेंद्र पाटील (रा. वडघे, ता. भडगाव) याने शिवीगाळ करीत येंडे यांच्या वाहनावर दगडफेक केली. दादागिरी करीत वाहनाची काच फोडून नुकसान केले. यासंदर्भात संबंधितांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी, भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळू माफियांना कुणाचे आशीर्वद ?
शासनाच्या वाळू निर्गती धोरणानुसार जिल्ह्यात एप्रिल २०२५ च्या दुसऱ्या सप्ताहात ई-ऑक्शन लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. यात पर्यावरण विभागाच्या मंजुरीनुसार २३ वाळू गटांसाठी निविदा प्रक्रिया राबविली. परंतु या प्रक्रियेला एकाही वाळू वाहतूकदार ठेकेदाराने प्रतिसादच दिलेला नाही. असे असले तरी जिल्ह्यातील रावेर, यावल, भडगाव, धरणगाव, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा आदी तालुका परिसरातील गिरणा, तापी तसेच अन्य नदी, नाले पात्रातून रात्री-बेरात्री वाळूचा अमाप उपसा केला जात आहे.
विशेषतः गिरणा नदीपात्रालगतच्या पाचोरा, भडगाव तालुक्यात कोणत्याही वाळू गटाचा लिलाव झालेला नसूनही कुरंगी, माहेजी, नांद्रा, परधाडे, बांबरूड, गिरणा पंपिंग स्टेशन, पुनगाव, भडगाव, वडधे आदी परिसरातून रात्री-बेरात्री जागत्यांच्या व खबऱ्यांच्या माध्यमातून अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. पाचोरा, भडगाव शहर परिसरात रस्तोरस्ती अनेक वाळूचे ढिग रात्रीतून टाकले जात आहेत. बरीच बांधकामे या अवैध वाळू वाहतुकीच्या माध्यमातून व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादातूनच होत आहेत.
जळगाव, एरंडोल आदी ठिकाणी कारवाई
दरम्यान, जळगाव शहर, एरंडोल तसेच अन्य ठिकाणचे महसूल अधिकारी, तहसीलदार तसेच उपविभागीय दंडाधिकारी हे अवैध वाळू वाहतुकीविरोधात धडक मोहीम राबवत आहेत. दंडात्मक तसेच वाहन जप्तीची कारवाईही सुरू आहे.
अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांचे सलोख्याचे संबंध
अवैध वाळू वाहतूकदारांच्या पंटर, खबऱ्यांकडून मंडळ अधिकारी वा तलाठी, महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या घराबाहेरील परिसरातच सुरक्षित अंतरावर सीसीटीव्हीसारखे उपकरण बसविण्यात आले आहेत. या माध्यमातून महसूल अधिकारी, कर्मचारी घरी केव्हा येतात व जातात, त्यांचा दौरा कोणत्या भागात आहे. तसेच लोकेशन, ठिकाणे याची इत्थंभूत माहिती खबरे, पंटर मोबाइल मेसेजद्वारे तागलीच पाठवितात. त्यामुळे कोणता मार्ग निर्धोक आहे. विना अडथळा वा रोकटोक न करता वाहन नदीपात्रातून बाहेर निघून इच्छित ठिकाणापर्यंत वाळू पोचवता येईल याची काळजी घेत राहतात. यात अवैध वाळू वाहतुकीस प्रशासनातीलच अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी यांच्या सलोख्याच्या संबंधांमुळेच एकही अवैध वाळू वाहतुकीचे वाहन या अवैध वाळू वाहतूकविरोधी पथकाच्या हाती लागत नसल्याचे दिसून येत आहे.