Jalgaon BJP News : भाजप प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी आज मंगळवारी राज्यभरातील नव्या जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर केली आहे. या यादीत जळगावचाही समावेश असून येथे खांदेपालट करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यभरात भाजपने पक्ष संघटना वाढवण्यावर भर दिला होता. त्या दृष्टीने संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय घेत त्यानुसार राज्यभरातील जिल्हाध्यक्षांची निवड मंगळवारी प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांच्याकडून जाहीर करण्यात आली. यात जळगाव जिल्ह्यातदेखील जिल्हाध्यक्षपदांबाबत खांदेपालट करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या आहेत. त्या दृष्टीने भाजपने राज्यभरातील जिल्हाध्यक्षांच्या नव्याने नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
जळगाव जिल्ह्याची धुरा तिघांकडे
विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात भाजपाने आपला प्रभाव कायम ठेवला आहे. आगामी काळात होणाऱ्या नगरपरिषदा, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपने तीन जिल्हाध्यक्षांची निवड मंगळवारी जाहीर केली असून त्यांच्याकडे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने धुरा सोपविली आहे.
असे आहेत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष
जळगाव जिल्ह्यात शहर जिल्हाध्यक्ष म्हणून माजी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांना पुन्हा संधी दिली आहे. तर आमदार अमोल जावळे यांचा भार हलका करून पूर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय चंद्रकांत बाविस्कर यांच्याकडे सोपविली आहे. तसेच पश्चिम जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी वैद्यकीय व्यवसायात कार्यरत असलेले प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राधेश्याम चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या तीनही जिल्हाध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.