मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह आज गुवाहाटी दौर्यासाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, काही आमदार आणि मंत्री या दौर्यात सहभागी झाले नाहीत. यात मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री तानाजी सावंत, मंत्री अब्दुल सत्तार, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, लता सोनवणे, आमदार सुहास कांदे, आणि उदय सामंत शिंदे हे या दौर्यात सहभागी झाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार आणि मंत्री नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई विमानतळावरुन आज सकाळी १० वाजता विशेष विमानाने शिंदे गटाचे आमदार आणि खासदार गुवाहाटीला रवाना झाले. या विमानात एकूण १८० जण आहेत. हे सर्वजण दुपारी१२ वाजेपर्यंत गुवाहाटीत पोहचतील. त्यानंतर ते देवीचं दर्शन घेतील. कामाख्या देवीच्या मंदिरात ते विशेष पुजा करणार आहेत. त्यानंतर हा गट आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांचीही भेट घेणार आहे. सत्तांतर नाटयावेळी प्रसिद्ध झालेल्या ‘रेडिसन ब्लू’ हॉटेलमध्ये ते मुक्काम करणार आहेत. उद्या संध्याकाळी हा गट पुन्हा महाराष्ट्रात परतणार आहे.
आमचा दुसरा काही अजेंडा नाही : मुख्यमंत्री
दौर्याला रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळावर शिंदे प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले की, कामाख्या देवीचा नवस आम्ही आज फेडणार आहोत. यावेळी देवीला राज्याच्या सुखसमृद्धी आणि भरभराटीसाठी साकडं घालणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. राज्यातील बळीराजाला चांगले दिवस येऊ द्या. जनता सुखी होऊ दे. राज्यावरील संकट दूर होऊ दे, यासाठीच आम्ही जात आहोत. आमचा दुसरा काही अजेंडा नाही आहे. जनतेच्या जीवनात अमुलाग्र बदल, सुख, समृद्धी, आनंद असू दे. राज्यातील जनतेला सुखी करावे, या भावनेने आम्ही कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहोत.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निमंत्रण दिले होते. तेव्हा आम्ही गडबडीत होतो त्यामुळे महाराष्ट्रात परत आलो. आता आसामच्या मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिल्याप्रमाणे आम्ही जात आहोत. कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहोत. त्यामध्ये कोणाला काही वाईट वाटण्याचे कारण नाही. आमची श्रद्धा आहे. भक्तीभावाने सर्व लोकांची इच्छा आहे, तिकडे परत जायची आणि जात आहोत, असेही शिंदे म्हणाले.