जळगाव : सुवर्णनगरी दिवसेंदिवस झळाळत आहे. शुक्रवारी (३ एप्रिल) अवघ्या १२ तासांत पुन्हा सोन्याच्या दरात (Jalgaon gold rate) तब्बल ७०० रुपयांची वाढ झाली आणि दर जीएसटीसह प्रतितोळा ९४ हजार ७०० रुपयांपर्यंत उच्चांकी पातळीवर पोहोचलेय. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे ग्राहकही संभ्रमात आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सत्तेत आले आणि त्यानंतर त्यांनी जाहीर केलेल्या धोरणाचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे दिसून येत आहे. रशिया-युक्रेन युद्धात रशियाने तडजोड करावी, अशी अमेरिकेची विनंती रशियाने धुडकावून लावल्याचा परिणाम म्हणून, पुन्हा युद्धजन्य परिस्थिती कायम राहण्याची शक्यता लक्षात घेता, सुरक्षित गुंतवून म्हणून गुंतवणूकदार सोन्याकडे वळले. त्यामुळे सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होऊन दरावर परिणाम होत आहे.
दरवाढ अजून वाढ होण्याची शक्यता !
तीन दिवसांपूर्वीही सोन्याच्या दरात प्रतितोळा हजार रुपयांची वाढ होऊन दर जीएसटीसह ९३ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. सोन्याच्या प्रतितोळा दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शुक्रवारी (३ एप्रिल) सोन्याचा दर जीएसटीसह ९४ हजार ७०० रुपयांपर्यंत पोहोचला. येत्या काही तासांत किंवा काही दिवसांत ही दरवाढ अजूनही होण्याची शक्यता असून, सोन्याचे दर प्रतितोळा ९५ ते ९७हजारांवर पोहोचू शकतात, असा अंदाज आर. सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक सुनील बाफना यांनी वर्तविला आहे.

दरम्यान, वाढत्या दरात ग्राहक सोने खरेदीबाबत वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे पाहायला मि ळत आहे. वाढलेले सोन्याचे दर आवाक्याबाहेर असल्याने, खरेदीचे बजेट बिघडल्याने कमी प्रमाणात सोने खरेदी करावे लागत आहे आणि वाढत्या भावामुळे आम्हीच स्वतः संभ्रमात असल्याचे ग्राहक डॉ. नयना महाजन व रमेश पाटील यांनी सांगितले. सध्या असलेले सोन्याचे दर सर्वसामान्य ग्राहकांसाठी परवडणारे नसल्याचे चित्र दिसत आहे.