जळगाव : रनिंग करत खेळत असलेल्या बालकावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. चाळीसगावच्या गणेशपूर पाटणा रस्त्यावर शनिवार, १४ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रिंकेश गणेश मोरे (१३, रा.गणेशपूर) असे मयत बालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील गणेशपूर परिसरात रिंकेश आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. शनिवार, १४ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गणेशपूर पाटणा रस्त्यावर काही लहान मुले रनिंग करत खेळत होती. खेळत असताना रनिंग करत असलेला रिंकेश मोरे हा मागे राहून गेला.
दरम्यान, शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. रिंकेशला ओढत ओढत बाजूच्या शेतात नेले. पुढे निघून गेलेल्या मुलांना रिंकेश दिसला नाही म्हणून त्यांनी रिकेंशचा शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही.
याबाबत रिंकेशच्या आई वडीलांना कळविण्यात आले. रिंकेशचा शोध घेत असतांना प्रकाश काशिनाथ पाटील यांना तो शेतात मृत अवस्थेत आढळून आला. वनविभागाला पाचारण करण्यात आल्यानंतर अधिकारी यांनी रात्री पंचनामा केला.
याप्रकारानंतर लहान मुलांना रात्रीच्या वेळी खेळण्यासाठी किंवा रनिंग करण्यासाठी घराबाहेर पडू देऊ नये असे आवाहन चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी केले आहे. वनविभागाने याठिकाणी पिंजरा लावून नागरिकांना संरक्षणाची हमी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.