रामदास माळी
चाळीसगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगावनंतर सर्वाधिक मतदार असलेला चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ आहेत. यात सुमारे २ लाख मतदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील मतदारांचे मतदान उमेदवारांच्या विजयासाठी निर्णायक ठरणार आहे. या मतदारसंघात भाजपचे प्राबल्य आहे. या मतदारसंघात आमदारही भाजपचा आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक गट, गणात भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासाठी ही लढत सोपी आहे. दुसरीकडे मात्र याच मतदारसंघातून खासदार म्हणून उन्मेश पाटील भाजपकडून निवडून आले होते. परंतु त्यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांनी त्यांचे पारोळ्याचे निकटवर्तीय मित्र करण पवार यांच्यासाठी महाविकास आघाडीकडून जळगाव लोकसभेची उमेदवारी पदरात पाडून घेतली. मात्र महायुतीच्या मातब्बर उमेदवारांशी त्यांचा लढा असल्याने करण पवार यांना उन्मेश पाटील या मतदारसंघातून किती मताधिक्य मिळवून देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजपकडून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तालुक्यात घराघरात जाऊन मतदारांच्या गाठी भेटी लक्ष केंद्रीत करून तालुका पिंजून काढला आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातून भाजपच्या उमेदवार सद्यःस्थितीतील स्थितीतील भाजप व मित्र पक्षाचे प्राबल्य पाहता महायुतीच्या उमेदवारासाठी वातावरण अनुकूल असत्याची सध्याची स्थिती आहे.
चाळीसगाव मतदारसंघात भाजपची बूथस्वना मजबूत असल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारास या मतदारसंघातून लिड घेणे अशक्य बाब आहे. मात्र तरीही महाविकास आघाडीकडून मताधिक्य मिळविण्यासाठी तोडका प्रयत्न सुरू आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीचा एरंडोल मतदारसंघ होता. त्यावेळी एम. के. पाटील भाजपकडून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर मात्र मतदारसंघाच्या रचनेत बदल झाला.
जळगाव लोकसभा मतदारसंघाची नव्याने रचना होऊन त्यात चाळीसगावसह सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला. तसेव भङगाव, पाचोरा मतदारसंघात भाजपचे मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचेच किशोर पाटील विद्यमान आमदार आहेत. परिणामी या दोन्ही मतदारसंघात भाजप शिवसेनेला दशकापासून आपले वर्चस्व राखण्यात यश मिळाले आहे.
दोन दशकांपासून भाजपचेच वर्चस्व…
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात दोन दशकांचा इतिहास पाहता या मतदारसंघात भाजपकडून एम. के. पाटील, साहेबराव घोडे, उन्मेश पाटील आमदार म्हणून निवडून आले. मंगेश चव्हाण हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे गेल्या २० वर्षांपासून भाजपचाच आमदार या तालुक्यात निवडून आल्याने लोकसभा निवडणुकीतही महायुतीच्या उमेदवारासाठी ही जमेजी बाजू आहे. या मतदारसंघात आमदार मंगेश चव्हाण यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांचा फायदा महायुतीच्या उमेदवारास होणेही साहजिक आहे. मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवारास मोठे मताधिक्य देण्याच्या वल्गना करणारे उन्मेश पाटील हे विसरले की, चाळीसगाव मतदारसंघ दोन दशकापासून भाजपचाच बालेकिल्ला राहिला आहे. त्याअनुषंगाने उन्मेश पाटील या मतदारसंघातून करण पवार यांना किती मतदानाचा लिड देऊ शकतील हे १३ मे रोजीच्या मतदानातूनच दिसणारच आहे. उन्मेश पाटील खासदार असताना त्यांनी चाळीसगाव तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यात त्यांच्या भेटी अत्यल्प राहिल्या. शेवटी संसदेच्या कामगिरीत टॉप टेन राहून चालत नाही तर जनतेमधून टॉप टेन राहण्याची गरज असते. हा संदेश महायुतीने उमेदवारी नाकारत याअनुषंगाने त्यांना दिला.