जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे माजी आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान, त्यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्याबाबत शिवसेना (उबाठा) गटाच्या उमेदवारीबाबत पेच निर्माण झाला आहे.
त्यामुळे उमेदवारीबाबत पदाधिकारी तसेच कार्यकर्ते, जनतेचा कानोसा घेण्यासाठी पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख आज २० रोजी जळगावात येत आहेत. सर्वांशी चर्चा करून ते वरिष्ठांना अहवाल देतील. त्यानंतर पक्षाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाविकास आघाडीत जळगाव लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्याचे निश्चित झाले.
पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत आज २० रोजी जळगाव दौऱ्यावर येत आहेत. ते पक्षाचे पदाधिकारी तसेच मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांशीही चर्चा करण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांकडून उमेदवारीबाबत कानोसाही घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर ते आपला अहवाल तातडीने वरिष्ठांना सादर करतील. त्यानंतर उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान,पक्षातर्फे भारतीय जनता पक्षातून नुकत्याच प्रवेश केलेल्या अमळनेर येथील ॲड. ललिता पाटील, जळगावचे माजी महापौर कुलभूषण पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.