Jalgaon Lok Sabha Election Result : जळगाव लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं. या मतदारसंघात भाजपने आपला गड राखला असून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ या विजयी झाल्या आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे करण पवार यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान मागील २० वर्षांपासून जळगावात भाजपचा खासदार आहे, त्यामुळे यंदा येथे काही चमत्कार होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर या मतदारसंघात भाजपने आपला गड राखला असून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ या विजयी झाल्या आहे.
जळगाव मतदारसंघाचा विचार करायचा झाल्यास यामध्ये जळगाव शहरासह ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव व पाचोरा या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यातील जळगाव, चाळीसगावात भाजपचे, तर जळगाव ग्रामीण, एरंडोल व पाचोरा येथे शिवसेना (शिंदे गट) आमदार आहेत.
अमळनेरला राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार आहेत. जळगाव (ग्रामिण) येथे गुलाबराव पाटील, पाचोऱ्यात किशोर पाटील व एरंडोलमध्ये चिमणराव पाटील हे शिवसेनेचे आमदार असल्याने येथे शिंदे गटाची भूमिका महत्त्वाची मानली जात होती.