जळगाव/पुणे । राज्यात ब्रेकनंतर मान्सून सक्रिय झाला असून मागल्या चार पाच दिवसापासून राज्यातील विविध भागात पाऊस होत असल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. अशातच हवामान खात्यानं आज राज्यातील काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाण्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
त्याचबरोबर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भात देखील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला असून आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात काय आहे स्थिती?
उत्तर महाराष्ट्रात देखील आज जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बुधवारी रात्री जळगाव जिल्ह्यामधील अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. सध्या जिल्ह्यातील ज्या भागात चांगला पाऊस झाला तेथे पेरणीला वेग आला आहे. तर काही भागात अद्यापही पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जळगावात सध्या ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळत असून आज दुपारनंतर पावसाची शक्यता आहे.