jalgaon Municipal Corporation: गेल्या पाच ते सहा वर्षापासून मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या 519 थकबाकीदारांपैकी 98 थकबाकीदारांच्या मालमत्तांच्या लिलावाबातचा अंतिम निर्णय संक्रांतीला म्हणजे सोमवार, 15 रोजी घेण्यात येणार आहे.
शहरातील विविध भागातील 519 मालमत्ता धारकांनी अनेक वर्षांपासून करांचा भरणा केला नव्हता. अशा 519 थकबाकीदारांना महापालिकेने वेळोवेळी नोटीसा पाठवूनही त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नव्हता.त्यामुळे महापालिकेने या सर्व मालमत्तांचा लिलाव करण्याची कार्यवाही सुरू केली होती. त्यामुळे या थकबाकीदारांचे धाबे दणाणले. त्यांनी आयुक्तांची भेट घेत शास्ती माफ केली तर लगेच भरणा करण्याची तयारी दाखविली. आयुक्तांनी त्यांच्या अधिकारानुसार या 519 जणांसाठी 100 टक्के शास्ती माफीची योजना राबविली. 31 डिसेंबरपर्यंत ही योजना होती. यात 98 थकबाकीदारांनी करांचा भरणा केलाच नाही.
सक्रांतीला येणार संक्रांत
या 98 मालमत्ता धारकांना करांचा भरणा करण्यासाठी पुरेपुर वेळ व मुदत देण्यात आली होती. त्यांच्यासाठी शास्ती अभय योजनाही राबविली. परंतु त्यांनी करांचा भरणा केला नाही. त्यामुळे या 98 जणांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचे निश्चित झाले आहेत. याबाबत सोमवारी, 15 रोजी अतिंम निर्णय घेत लिलावाची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगीतले.