Jalgaon Municipal Corporation: बंद गल्ल्यांमध्ये होणार वाहनांचे पार्किंग

Jalgaon Municipal Corporation: नवी पेठेतील अनेक गल्ल्यांंंबोळी आहेत, या गल्ल्यांंबोळी आता पार्कीगसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. दरम्यान, या जागांचा अनधिकृतपणे वापर करणाऱ्यांना दंड आकारला जाणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी दिली. बेसमेंटमधील पार्कीगच्या जागेवर गोडावून व दुकाने सुरु करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केल्यानंतर आता मनपाने बोळीतील जागांचा वापर करणाऱ्यांकडे मोर्चा वळविला आहे.

नवी पेठेसह मुख्य बाजार पेठ व वर्दळीच्या भागात जुन्या बोळी आहेत. या जागा महापालिकेच्या असून अनेक व्यावसायिकांनी या जागा बळकावल्या आहेत. आताच सील केलेल्या काही दुकानदारांनी त्यांच्या दुकानाच्या मागे बोळीत जनरेटर ठेवून जागेचा वापर करीत असल्याचे उघड झाले. ही जागाही खाली केली जाणार असून संबंधिताकडून वापर होत असलेल्या दिवसापासून दंड आकारला जाणार आहे. अशा जागा कुठे व किती आहेत याची माहिती काढण्याच्या सूचना आयुक्तांनी नगररचना विभागाला दिल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी गल्लीच बंद करण्यात आल्याचेही प्रकार उघडकीस आले आहेत.

रॅम्पसाठी व्यावसायिकांचे अर्ज
महापालिकेने गेल्या आठवड्यात पाच दुकाने सील केली आहेत. त्यातील दोन दुकानदारांनी रॅम्प तयार केले आहेत. तर अन्य दुकानदारांनी रॅम्प तयार करण्यासाठी दुकान उघडण्याची परवानगी मागितली आहे. या अर्जावर अजून निर्णय घेण्यात आलेला नाही. फक्त रॅम्प तयार करण्यासाठीच परवानगी दिली जाणार आहे.

चारचाकी पार्किगसाठीही जागांचा शोध
नेहरू चौक ते टॉवर चौंक या परिसरात असलेल्या विविध खासगी व्यापारी संकुलातील बेसमेंट आता ग्राहकांच्या वाहनांच्या पार्किगसाठी खुली करण्यात येत आहेत. यामुळे मुख्य रस्त्यावर दुचाकी पार्क करण्याची संख्या शुन्यावर येणार आहे. आता चारचाकींच्या पार्किगचा प्रश्न उपस्थित होत असून त्यावरही जागांचा शोध घेण्यात येत आहे.