Jalgaon Municipal Corporation : मनपा सहाय्यक आयुक्त तुषार आहेर यांची बदली

Jalgaon Municipal Corporation : जळगाव महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तुषार आहेर यांची नाशिक महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदी बदली करण्यात आली.

 

तुषार आहेर यांची दि.२ फेब्रुवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथून जळगाव महापालिकेत बदली झाली होती. ते दि.१४ फेब्रुवारी रोजी जळगाव मनपात रूजू झाले होते. त्यानंतर ते सुटीवर गेले असून दि.१५ तारखेला पुन्हा रूजू झाले होते.

परंतु त्यांना अद्यापपर्यंत कोणताच पदभार देण्यात आलेला नव्हता. अखेर दि.२६ रोजी त्यांनी आपली बदली करून घेतली. शासनाचे अवर सचिव अ.का.लक्कस यांनी प्रशासकीय कारणास्तव त्यांची बदली केल्याचे आदेशात नमुद केले आहे.

 

महापालिकेत सध्या अधिकाऱ्यांमध्ये मोठ्याप्रमाणात राजकारण सुरु झाले आहे. अधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडले असून काही अधिकाऱ्यांचे वारंवार पदभार बदलण्यात येत आहेत तर, काही अधिकाऱ्यांचे पदभार कायम ठेवण्यात येत असून त्यांच्याकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

 

या सर्व प्रकारामुळे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होत असून आयुक्तांकडून महत्वाचे विभाग आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येत असल्याची चर्चा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आहे. तसेच दोन अधिकाऱ्यांकडून बदलीसाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे.