Jalgaon Municipal Corporation: दिवाळीपासून मिळणार ‌‘वॉटर मिटर’ने 24 तास पाणी

Jalgaon Municipal Corporation: जळगाव : शहरातील अमृत 1.0 योजने अंतर्गंत सुरु असलेले काम आता अंतिम टप्प्यात आले असून दिवाळीपासून ‌‘वॉटर मिटर’ने 24 तास पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता संजय नेमाडे यांनी दिली.

अमृत 1.0 योजनेचे काम जवळपास पुर्ण होत आले आहे. त्यानुसार डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत शिवाजी नगरातील काही भाग वगळता पुर्ण शहरातील अमृत योजना सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे जुनी पाईपलाईन बंद होणार आहे. ज्या नागरिकांनी अमृत योजनेचे नळ कनेक्शन बाकी असेल त्यांनी तातडीने आपले नळ कनेक्शन जोडणी करून घ्यावी, असे आवाहन मनपाच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

अमृत 2.0 चा डीपीआर मजिप्रकडे सादर

अमृत योजनेचा पहिला टप्पा पुर्ण होत असून अमृत 2.0 चा डीपीआर शासनाकडे पाठविण्यात आला होता. सदर डीपीआरमध्ये काही त्रुटी निघाल्यामुळे हा डीपीआर परत पाठविण्यात आला होता. त्यानंतर मनपाने डीपीआरमधील त्रुटी दूर करून पुन्हा हा डीपीआर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. मजिप्राकडून हा डिपीआर नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे जाणार असून तेथून राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे. जानेवारी अखेरपर्यंत अमृत 2.0 च्या डीपीआरला मंजुरी मिळण्याची शक्यता असून पुढील दोन महिन्यात निविदा प्रक्रिया पुर्ण होवून कार्यादेश दिले जाऊ शकतात. त्यानंतर शहरातील सर्व नळांना मीटर बसविण्यात येवून दिवाळीपर्यंत संपुर्ण शहराला चोवीस तास पाणी पुरवठा सुरु केला जाईल.

रेल्वे क्रॉसिंगमुळे शिवाजीनगरातील 30 टक्के भाग वेटींगवर

शिवाजीनगरातील 30 टक्के भाग वगळता संपुर्ण शहरात अमृतचा पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अमृतच्या पहिल्या टप्प्यातील 95 टक्के काम पुर्ण झाले असून 80 हजार नळ कनेक्शन दिले गेले आहेत. परंतु शिवाजीनगरमधील पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी रेल्वे क्रॉसिंगचे काम अद्याप झालेले नसल्यामुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता त्या अडचणी देखील मार्गी लागल्या असून लवकरच रेल्वेशी करारनामा करून रेल्वे क्रॉसिंगचे काम पुर्णत्वास येणार आहे. मात्र, तोपर्यंत शिवाजीनगरातील 30 टक्के भाग वगळून शहरातील अमृत योजना सुरु करण्यात येणार आहे.