जळगाव : महापालिकेच्या नवीन २१०० पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र सेवा प्रवेश नियमावली निश्चित न झाल्याने ही प्रकिया खोळंबली आहे.
पुन्हा मागविली सेवाप्रवेश नियमावली
आता पुन्हा सेवाप्रवेश नियमावली महापालिकेकडून मागविली आहे. परंतु या नंतरही प्रक्रियेला बराच विलंब लागणार आहे. दरम्यान, महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून भरती प्रक्रिया झालेली नाही. यातच दरवर्षी मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचारी निवृत्त होत आहेत.
कंत्राटी पद्धतीने भरलेल्या ८६ पदांची मुदत संपली
कर्मचारी संख्या कमी असल्याने महापालिकेत ८६ कंत्राटी पदे भरली होती. यात लिपिक तसेच इतर पदे होती. सहा महिन्यांसाठी ही पदे भरण्यात आली. त्यांची मुदत आता संपली आहे. त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात येणार होता.
मात्र लेखा परीक्षक विभागाने त्याला मंजुरी न देता नव्याने भरती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ही कंत्राटी पदेही आता बाधित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे कर्मचारी कमी झाले तर महापालिकेत पुन्हा कामाचा प्रश्न निर्माण होणार असून जनतेची कामे खोळंबण्याची शक्यता आहे.
शासनाने मंजूर केलेल्या २१०० पदाच्या सेवाप्रक्रियेची माहिती मागवली आहे. ती महापालिकेकडून पाठविण्यात आली आहे. त्याला मंजुरी नवीन आल्यानंतर भरतीची पूढची प्रकिया सुरू होईल.
– अविनाश गंगोडे, उपायुक्त, महापालिका जळगाव