---Advertisement---
जळगाव : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अद्याप निवडणुकीची घोषणा झाली नसली, तरी आत्तापासूनच मनपा निवडणुकीसाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपने शक्य तिथे महायुती आणि ज्या ठिकाणी ताकद आहे, तेथे स्वबळाची भाषा वापरली आहे. त्यामुळे राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिंदे आणि अजित पवार गटाने मात्र एकत्र येत वेगळी चूल मांडण्याची तयारी केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महायुती सरकारमधील तीनही नेते ठामपणे भूमिका घेताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्य तिथे महायुती करून निवडणुका लढवू, असे विधान केल्याने काही ठिकाणी स्वबळाचे संकेत दिले आहेत. तसेच स्थानिक स्तरावरील नेत्यांनीही आपापली ताकद अजमावण्यासंबंधीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सन २०१८ च्या महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्याशी युतीची बोलणी केली होती. मात्र ऐनवेळी भाजपने स्वबळावर निवडणूक लढविली आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली ५७नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर मात्र मविआच्या सत्ताकाळात भाजपमधील नगरसेवक फुटले आणि महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता आली होती.
जिल्ह्यासह शहरात ताकद आमचीच, भाजपचा दावा
जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. तब्बल २० वर्षांपासून या जिल्ह्यात दोन्ही खासदार हे भाजपचेच राहिले आहेत. यंदाही दोन्ही खासदार हे भाजपचेच आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचे संख्याबळ सारखे आहे. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून एकमेव अनिल भाईदास पाटील हे आमदार आहेत. असे असले तरी ताकद आमचीच, असा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे भाजप मनपा निवडणुकीत काय भूमिका वा निर्णय घेईल, याकडे शिंदे आणि अजित पवार गटाचे लक्ष लागले आहे.
…तर शिंदे आणि अजित पवार गटाची युती होणार
गत निवडणुकीप्रमाणे भाजपने यंदाही स्वबळाचा नारा दिल्यास शिवसेना शिंदे गट आणि निवडणुकाप्रमाण राष्ट्रवादी अजित पवार गट हे दोन्ही पक्ष युतीच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप नेत्यांमध्ये चर्चा नसली तरी कार्यकर्त्यांमधून तसा सूर उमटत आहे. कारण जळगाव शहरात शिवसेनेची ताकद राहिली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटानेदेखील मनपा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. जागा वाटपात योग्य स्थान न मिळाल्यास शिवसेना शिंदे आणि अजित पवार गट हे भाजपला टक्कर देण्याच्या तयारीत आहेत