Jalgaon Municipality : मनपाचा ‌‘नो व्हेईकल डे’ देतोय रस्त्यावर बेशिस्त पार्किगला निमंत्रण

Jalgaon Municipality : महिन्याच्या पहिल्या बुधवारी महापालिकेतर्फे ‌‘नो व्हेईकल डे’ पाळला जात असला तरी तो आता रस्त्यावरील बेशिस्त पार्किंगसाठी प्रोत्साहन देणारा ठरत आहे. महापालिकेत विविध कामांसाठी येणारे ‌‘नो व्हेईकल डे’ मुळे वाहने थेट रस्त्यावरच बेशिस्तपणे लावत आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

वाहनांमुळे होणारे प्रदुषण कमी व्हावे याबाबत जनजागृती करण्यासोबतच त्याची स्वत:पासून अंमलबजावणी करण्याचा चांगला पायंडा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी पाडला आहे. त्या स्वत: मनपाच्या ई कारने तर कधी रिक्ष्ााने येत असतात. अधिकारीही वाहनाने येत असले तरी वाहन मुख्य प्रवेशव्दाराबाहेरील गल्ली बोळात लावत असतात. तर विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मात्र या उपक्रमाची माहिती नसल्याने ते वाहने घेवून येतात.

रस्त्यावर होतेय बेशिस्त पार्किंग

मनपात येणारे नागरीक, कर्मचारी हे वाहने घेवून येतात. मात्र मुख्य प्रवेशव्दार बंद असल्याने प्रवेशव्दारासमोरच वाहने अस्ताव्यस्तपणे लावून मनपात कामासाठी जात असतात. त्यामुळे प्रवेशव्दारापासून तर थेट रस्त्यांवरच दुचाकी लावल्या जातात. यात भर म्हणजे चारचाकीने येणारे नागरिक, मक्तेदार यांची वाहनेही भर रस्त्यात उभी राहत असतात. यामुळे बेशिस्त पार्किंगसोबतच मुख्य रस्त्यावरील वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे.

सुरक्ष्ाारक्ष्ाकांशी होतात वाद

वाहने गेटसमोर न लावण्यावरून व शिस्तीत लावण्यावरून सुरक्ष्ाारक्ष्ाकांशी दुचाकी स्वारांसह चारचाकीधारकांशी वाद होत आहेत.

 

शिस्तीचा बागुलबुवाच

नेहरू चौक ते टॉवर चौक या रस्त्यावर दुचाकी, चारचाकीसह फिरत्या विक्रेत्यांच्या होणाऱ्या अतिक्रमणामुळे आयुक्तांनी रस्ता दुभाजकापासून 12 मिटर अंतर मोजून पार्किंगसाठी पिवळ्या रेषा आखली होती. हे काम तातडीने करण्यात आले. त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन विभाग व शहर वाहतूक पोलीसांनी दोन दिवस या पिवळ्या रेषेच्या आतील वाहनांवर कारवाई केली. मात्र नंतर कारवाईत सातत्य नसल्याने पुन्हा जैंसे थे झाले आहे.