जळगाव : एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रूक येथे शासनमान्य खासगी वसतिगृहात पाच अल्पवयीन मुलींच्या लैगिक शोषणप्रकरणी नागरी हक्क संरक्षण विभागाच्या महिला पोलीस अधीक्षक शुक्रवार, २८ जुलै रोजी जळगावात दाखल झाल्या. त्यांनी पाचही मुलींची भेट घेतली. यावेळी या मुलींनी त्यांच्यावर बेतलेली आपबिती कथन केली.
नागरी हक्क संरक्षण व महिला अत्याचार प्रतिबंध विभाग संभाजीनगर परिक्षेत्राच्या महिला पोलीस अधीक्षक यांनी पथकासह जळगाव येथे धाव घेतली. त्यांनी या मुलींशी संवाद साधला. त्यांच्याकडून घडलेल्या प्रकाराचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. जिल्हा शासकीय रुग्णालयात संभाजीनगर तसेच नाशिक येथून दुपारी पथक रूग्णालयात दाखल झाले.
यावेळी या पाचही अल्पवयीन मुलींना वैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर महिला अधीक्षकांंनी एका बंद रूममध्ये या मुलींना बोलवून घेतले. त्यांच्याशी अतिशय आस्थेवाईक पध्दतीने संवाद साधला आणि त्यांना बोलते केले. वसतिगृहात गुजरलेल्या अत्याचाराची प्रत्येक पीडित अल्पवयीनकडून प्रकार त्यांनी अतिशय बारकाईने जाणून घेतला. महिला बालकल्याण अधिकारी कार्यालयातील वैद्यकीय अधिकार्याकडूनही माहिती घेतली.
संवाद झाला मॅरेथॉन
दुपारी एक वाजेपासून सुरू झालेला हा संवाद सायंकाळी साडेचार वाजेपर्यत अखंड सुरू होता. बंद रूममध्ये स्थानिक महिला पोलीस अधिकारी, महिला वैद्यकीय अधिकारी, जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी कार्यालयातील तसेच बालकल्याण समिती सदस्य यावेळी उपस्थित होते.
नागरी हक्क संरक्षण विभाग अधीक्षक कार्यालय संभाजीनगर यांच्याकडे एकूण ११ जिल्ह्यांची जबाबदारी आहे. त्यात नाशिक विभागातील सहा, तर औरंगाबाद येथील सहा जिल्ह्यांचा समावेश आहे.
आर्थिकदृष्ट्या मागासलेपण, अशिक्षितता अशा कुटुंबातील बहुतांश मुली आहेत. या मुलींनी शिकून चांगले जीवन घडावे, या उदात्त विचारातून पालकांनी या मुलींना वसतीगृहात पाठविले होते. परंतु वसतीगृहातील काळजीवाहकानेच या मुलींवर अत्याचार केला. तर हा प्रकार कानावर टाकूनदेखील वसतिगृहातील अधीक्षिका अरूणा हिने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले. हा संपूर्ण घटनाक्रम नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षकांंनी नोंदविला आहे.
काय आहे प्रकार?
खडके येथे वसतिगृहातील बालगृहात या मुली राहत होत्या. काळजीवाहक गणेश पंडित हा गेल्या वर्षभरापासून या पाच अल्पवयीन मुलींवर अत्याचार करीत होता. मुलींनी तक्रार केली, मात्र अधीक्षिका तसेच सचिव यांनी दखल घेतली नाही. महिला आणि बालकल्याण समितीकडे या मुलींनी तक्रार दिली. सदस्यांनी या मुलींची कैफियत ऐकून घेतली. जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी यांनी एरंडोल पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी स्वत: फिर्याद देत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी काळजीवाहक गणेश पंडित, अधीक्षक अरूणा पंडित यांना ताब्यात घेत गुरुवार, २७ रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले असता गणेश पंडित याची पोलीस कोठडी तर अरूणा पंडित हिची न्यायालयीन कोठडी अंतर्गत कारागृहात रवानगी करण्यात आली.
महिनाभरात अहवाल सादर करावा-महिला व बालविकास मंत्री
बालगृहांच्या तपासणीसाठी कृती दलाची स्थापना करुन दर तीन महिन्यांनी अहवाल शासनास सादर करावा. जळगाव येथे मुलींच्या वसतिगृहात घडलेल्या घटनेचा महिनाभरात अहवाल सादर करावा, असे निर्देश महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांनी विभागाच्या आढावा बैठकीत दिले.