जळगाव : गारबर्डी येथील रस्त्यालगत वनजमिनी मिळत असल्याच्या अफवेने संपूर्ण गावाने जंगलाकडे धाव घेतली. विशेषतः कुऱ्हाड, विळा हातात घेऊन वनजमिनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, वनविभागाने ग्रामस्थांची समजूत घालून त्यांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता वन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.
या राखीव वनजमिनीवर प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी आपला हक्क दर्शविणारे दगड ठेवले. या भागात राखीव वनक्षेत्रात परप्रांतीय व बाहेरगावातून आलेल्या नागरिकांना तथा खोट्या दावेदारांना जमिनी मिळत असल्याबाबत ग्रामस्थांकडून रोष व्यक्त होत असून, स्थानिक लोकांनी रहदारीसाठी वनजमीन मिळावी, या हेतूने या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे.
ग्रामस्थांनी सकाळी सहापासून वनजमिनी ताब्यात घेऊन सांभाळली आहे. या वनक्षेत्रात अतिक्रमणाचा ताबा करीत असल्याची बातमी वन्यजीव वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळविले आहे. यावेळी घटनास्थळी वनपाल अरविंद धोबी, वनरक्षक सहस्त्रलिंग लेदा बारेला, वनरक्षक सुधीर पटणे हे उपस्थित होते.
पाल ग्रामस्थ म्हणतात…
पाल परिसरात जंगलात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होऊन शेकडो हेक्टर जमीन दावेदारांना शासनातर्फे मिळाली. आमच्या चार, पाच पिढ्या (पणजोबा, आजोबा) वर्षानुवर्षे या गावात स्थानिक राहात असून, आम्ही कधी जंगलात अतिक्रमण केले नाही.