जळगाव : चाळीसगावातील गोपालपुरा भागात अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्यांवर शहर पोलीसांनी छापा टाकला. या कारवाईत ८८ हजार ५७० रूपये किंमतीचा ३ किलो ३१४ ग्रॅम गांजा हस्तगत केला. दोन जणांना ताब्यात घेतले असून इतर दोन फरार झाले आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चाळीसगाव शहरातील गोपालपुरा भागात बेकायदेशीर गांजा विक्री होत असल्याची गोपनिय माहिती पोलीस उपअधिक्षक अभयसिंह सुर्यवंशी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याची पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार पोलीसांनी बुधवार ९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता गोपालपुरा भागात छापा टाकला.
या कारवाईत पोलीसांनी ८८ हजार ५७० रूपये किंमतीचा ३ किलो ३१४ ग्रॅम गांजा हस्तगत केला. याप्रकरणी मांगीलाल मुरलीधर गुजर (वय-५४) रा. गोपालपुरा, चाळीसगाव, आणि नसीमबी अश्रमअली (वय-५५) रा. नागदरोड, झोपडपट्टी, चाळीसगाव यांना ताब्यात घेतले. तर पिंटू पवार आणि साजन लंगड्या दोन्ही रा.चाळीसगाव हे दोघे पोलीसांना पाहून पसार झाले.
याप्रकरणी पोलीस नाईक दिपक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहे.