Jalgaon News : उन्हाचा तडाखा; गुरांना उष्माघाताचा धोका, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा पशुपालकांना ‘हा’ सल्ला

जळगाव : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला असून, दुपारनंतर बाहेर फिरताना नागरिकांना घामाच्या धारा लागत आहेत. वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरतोय, उन्हामध्ये सतत काम केल्याने शरीरातील तापमान नियंत्रित करण्याच्या यंत्रणेत बिघाड होताना दिसतोय. कोणत्याही सुरक्षेशिवाय उन्हामध्ये फिरल्यास उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. शिवाय, गुरांनाही मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची शक्यता आहे. या उन्हामुळे जनावरांना अनेक आजारांसह उष्माघाताचाही धोका संभवत असल्याने जनावरांची काळजी घेण्याचा सल्ला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

काय आहे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला ?
दुपारी हिरवा मका, लसूण घास खाऊ घाला, सकाळी व सायंकाळी गूळ आणि मिठाचे पाणी पाजण्याचा सल्ला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा पशुपालकांना दिला आहे.

गुरांना उष्माघाताची लक्षणे
जनावरांची तहान-भूक मंदावते.
जनावरे कोणतीही हालचाल न करता फक्त बसून राहतात.
पटूंना ८ ते १० तासांनंतर अतिसार होण्याची शक्यता बळावते.
श्वासोच्छासाचा दर वाढून धाप लागल्या- सारखे होते.
डोळे लालसर होऊन डोळ्यातून पाणी गळायला लागते.

काय आहेत उपाय ?
गोठ्यामध्ये भरपूर खेळती हवा असावी, गोठ्यात अधूनमधून पाणी फवारावे.
गुरांना सावलीत बसू द्यावे, शक्य असल्यास थंडपाणी अंगावर टाकावे, गोठ्याच्या छतावर पालापाचोळा, गवत टाकून त्यावर पाणी शिंपडावे, त्यामुळे गोठा परिसर थंड राहतो.
म्हशींमध्ये घामग्रंथींची संख्या कमी असल्यामुळे शरीराचे तापमान कमी करण्यासाठी म्हशींना पाण्यात सोडावे.
जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढत असून जनावरांना उष्माघातासह विविध आजारांचा धोका असल्याने पशू मालकांनी काळजी घ्यावी.
जिल्ह्यातील तापमान वाढत असल्याने त्याचा दुभत्या जनावरांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. तरी पशू मालकांनी दुपारी गायी व म्हशींना चरण्यासाठी सोडू नये, सकाळी १० वाजेपर्यंत व दुपारी ४ वाजेनंतर गुरांना बाहेर चरण्यासाठी सोडावे, त्यातच दुपारी गुरांना हिरवा मका, लसूण घास यासारखी पोषक वैरण खायला द्यावी, जेणेकरून उष्माघाताचा त्रास जाणवणार नाही, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.