जळगाव : गावठी कट्टा घेऊन फिरणार्या तरूणाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी मुक्ताईनगर पोलिस वेळोवेळी नाकाबंदी करत असतात. अशाच प्रकारे काल रात्री सव्वानऊच्या सुमारास नाकाबंदी करत असतांना पोलिसांना रवींद्र उर्फ माया तायडे हा तरूण गावठी कट्टयासह आढळून आला. त्याची झडती घेतली असता हा प्रकार उघडकीस आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.
तायडे याची चौकशी केली असता त्याने नशिराबाद येथील युवराज कडू होंडाळे याच्याकडून १९ हजार रूपयात हा कट्टा खरेदी केल्याची माहिती दिली. यासाठी मुक्ताईनगर येथील मयूर विजयसिंग राजपूत याचा फोन पे क्रमांक वापरल्याचेही त्याने सांगितले.
या माहितीवरून मुक्ताईनगर पोलीस स्थानकात रवींद्र उर्फ माया तायडे, युवराज कडू होंडाळे व मयूर विजयसिंग राजपूत या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तायडे आणि होंडाळे यांना ताब्यात गेण्यात आले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर राजकुमार शिंदे व पोलीस निरीक्षक नागेश मोहीते यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.निरी. प्रदीप शेवाळे ,पो.उप.निरी. राहुल बोरकर , पोहेकॉ लिलाधर भोई ,पोना धमंद्र ठाकुर, पोना मोतीलाल बोरसे, चापोना सुरेश पाटील , पोअं रविंद्र धनगर , प्रशांत चौधरी , राहल बेहनवाल यांच्या पथकाने केली आहे.