Jalgaon News : जिल्हा दूध संघाच्या माजी कार्यकारी संचालकांचा जामीन रद्द

जळगाव : जिल्हा दूध संघातील दूध भुकटी घोटाळ्या करण्याचा आरोप असलेले माजी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांचा अंतरीम जामीन छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने रद्द केला आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली आहे.

जळगाव जिल्हा दूध संघात झालेल्या दूध भुकटी, बटर घोटाळ्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना अटक करण्यात आली होती. जिल्हा न्यायालयाने त्यांना ४ मेपासून अंतरीम जामीन मंजूर केला होता.

दरम्यान जामिनाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात अपील केले होते. त्यावर शुक्रवारी २१ रोजी न्यायमूर्ती संभाजी मगर, न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांच्यापुढे सुनावणी झाली. यात मनोज लिमये यांचा अंतरीम जामीन रद्द करण्याचा आदेश खंडपीठाने दिला. त्यांना याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. सरकारतर्फे ॲड. जी. ओ. वट्टमवार यांनी काम पाहिले तर लिमये यांच्यातर्फे ॲड. आदित्य सिकची व ॲड. मुकुल कुलकर्णी यांनी काम पाहिले.