जळगाव : अवैध वाळू वाहतूक करत असलेल्या ट्रॅक्टरला पोलीस ठाण्यात नेण्याची कारवाई करीत असताना एकाने पोलिसाला धरून ढकलून दिले तर दुसऱ्याने वाळूचे वाहन पळवून नेल्याची घटना बुधवार २३ रोजी सकाळी सव्वाआठ वाजेच्या सुमारास शहरातील टॉवर चौक ते कॉंग्रेस भवन रस्त्यावर घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार कारवाया केल्या जात आहेत. चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी ॲक्शन मोडवर येत कारवाई सत्र हाती घेतले. शंभरावर ट्रॅक्टरसह अनेकांवर त्यांनी कारवाई केल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
भरचौकात घडलेला प्रकार शहर पोलीस ठाण्याचे सफौ संजय झाल्टे हे शहरात ड्यूटी बजावत होते. दरम्यान अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला त्यांनी थांबवून पोलिस ठाण्यात नेण्याची कारवाईला सुरूवात केली. त्याचवेळी क्रमांक एम.एच.१९ सीएफ २३२२ वरील कार चालक याठिकाणी धावून आला. त्याने पोलिसाला मिठीत धरले. ही संधी साधून दुसरा संशयित चालक याने वाळूचे ट्रॅक्टर तेथून पसार केले. त्यानंतर पकडलेल्या पोलिसाला संशयिताने जोराने ढकलून दिले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
घटनेची गंभीर दखल
घटना कळताच पोनि अनिल भवारी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पोलीस कर्मचाऱ्याकडून प्रकार जाणून घेतला. प्रकार अधिक जाणून घेण्यासाठी या रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरच्या फुटेज घेण्याच्या कामाला गती दिल्याचे कळते. वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेण्यात आल्याचे सूत्रांकडून कळाले. पोलीस कर्मचाऱ्यास कर्तव्यापासून परावृत्त केले तसेच शासकीय कामात अडथळा निमार्ण केला. तसेच शासकीय कर्मचाऱ्यावर दहशत घातली, अशा पध्दतीच्या तक्रारीवरून दोघा संशयितांविरूध्द गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. तपास एपीआय रवींद्र बागुल हे करीत आहेत. महसूल यंत्रणा, पोलीस व आरटीओच्या माध्यमातून धडक मोहीम गिरणा क्षेत्रात राबविली जात आहे. परिणामी वाळू माफियांच्या अवैध व्यवसायावर मोठा परिणाम झालेला दिसत आहे. काही जण रात्री चोरट्या पद्धतीने वाळू वाहतूक करतात तर काहींची हिंमत एवढी की, कारवाई सुरू असताना भरदिवसा वाळू चोरी करीत असल्याचे आता लक्षात येत आहे.
धानोरा-दापोऱ्यात वाळूचे साठे जप्त
तपासाचे चक्र फिरवित धानोरा येथे साठवणूक केलेला वाळूचा मोठा साठा पोलिसांनी कारवाई करून जप्त केला. बुधवार (२३) रोजी सायंकाळी तालुका पोलीस व एलसीबी पथकाने दापोरा शिवारातून ८० ब्रास वाळूचा साठा जप्त केला. अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी फिरते युनिट स्थापन केले असून त्याव्दारे निगरानी केली जात आहे. ही कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी व परीविक्षाधीन उपअधीक्षक आप्पासाहेब पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे गणेश वाघमारे यांच्या पथकाने केली. तालुका पोलिसांच्या दोन दिवसांपूर्वी कारवाईत पिकप बोलेरो वाहनातून वाळू वाहतूकीचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे यंत्रणा अधिक सतर्कतेने कारवाई करणार असल्याचे सुत्रांकडून कळाले…