जळगाव : गांजासह अंमली पदार्थांची राजरोस विक्री सुरू असल्याने तरुणाई नशेच्या विळख्यात अडकत आहे. अशातच सार्वजनिक जागी गांजा सेवन करीत धुम्रपान करणाऱ्या एकावर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे गांजा विक्रेते पोलिसांच्या रडारवर आले आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसांत एकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्ह्यात रोज लाखो रुपयांच्या गांजाची विक्री होते. इतर अंमली पदार्थांच्या तुलनेत गांजाची सहज उपलब्धता असल्याने तरुणाईला गांजाच्या नशेची चटक लागली आहे. शहरात आठ ते दहा विक्रेते रोज गांजाची विक्री करतात. पोलिसांकडून झालेल्या दुर्लक्षामुळे गांजा विक्रेत्यांनी थेट सार्वजनिक ठिकाणीही खुलेआम विक्री सुरू केली. मात्र आता पोलिसांनी कारवाईला सुरवात केली असून एकाला अटक देखील केली आहे. विशेषतः यामुळे ड्रग्ज, नशेखोर वर्दीच्या रडारवर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहातील जामनेर रोडवरील एस.बी.आय. बँकेच्यापुढे >शेख रमजान शेख रऊफ (38, जाम मोहल्ला, भुसावळ) हा संशयित अंधारात धुम्रपान करीत होता. रविवारी रात्री पावणे वाजता पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस कॉन्स्टेबल सचिन चौधरी यांनी त्यास ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार रमण सुरळकर करीत आहेत.