जळगाव : तरुणांमध्ये झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना शेंदुर्णी (ता. जामनेर) येथे बुधवार, ४ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. दगडफेकीत पोलिसासह पाच ते सहाजण जखमी झाले. या दरम्यान, पोलिस वाहनावरही दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेंदुर्णीतील एका व्यायामशाळेत बुधवार, ४ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काही युवकांमध्ये बाचाबाची झाली. याचे रूपांतर दोन गटातील हाणामारीत झाले. एकमेकांवर दगड व विटा फेकण्यात आल्या. काही तरुणांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन दुचाकींची तोडफोड केली. पोलिस पथक काही क्षणातच या भागात दाखल झाले.
यावेळी पोलिस वाहनावर दगडफेक करण्यात आली. यात एका पोलिसासह दोन्ही गटातील पाच ते सहाजण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलिस निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक भरत दाते, गणेश सुस्ते आदींनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पाचोरा येथील पोलिस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे हेदेखील घटनास्थळी पोहोचले.
खबरदारी म्हणून चाळीसगाव, पाचोरा, पिंपळगाव हरेश्वर, जामनेर, जळगाव येथून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, रात्री ११:३० वाजता पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शेंदुर्णीत घटनास्थळाची पाहणी केली.
दरम्यान, व्यायामशाळेत झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी व दगडफेकीचा प्रकार घडला. पोलिसांनी तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त रात्रीच तैनात करण्यात आला होता, अशी माहिती पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली.