जळगाव : पदवीचे शिक्षण घेत असलेल्या तरूणीने अभियांत्रिकी महाविद्यालयातील मित्रासोबत फोटो काढला. एका संशयिताने या फोटोत छेडछाड करून त्याला अश्लील स्वरूप देत हा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केल्याचा किळसवाणी प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरूणीच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात दोन व्हॉटसअॅप खातेधारक अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
अभियांत्रिकी महाविद्यालयात व्दितीय वर्षाचे शिक्षण घेत असलेली तरूणी १९ वर्षीय आहे. काही दिवसांपूर्वी महाविद्यालयातील मित्रासोबत तिने फोटो काढला. हा फोटो अज्ञात व्यक्तीने कोठुन तरी मिळविला. या फोटोला त्याने विवस्त्र अवस्थेतील महिला व पुरूषाच्या फोटोला जोडून बनावट फोटो तयार केला. छेडछाड करून नव्याने बनविलेला हा फोटो संशयिताने ३० जून ते २२ ऑगस्ट दरम्यान तरूणीच्या व्हॉटसअॅप क्रमांकावर पाठवून पिडीतेला धमकीचा मेसेजही पाठविला.
याप्रकाराने भयभीत होऊन तरूणीला जबर धक्का बसला. तिने हा प्रकार तत्काळ जवळच्या विश्वासातील व्यक्तींच्या कानावर टाकला. त्यानंतर या प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी पोलिसात जाण्याचा निर्धार केला. तरूणीने तत्काळ बुधवारी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत कैफियत मांडली. तिच्या तक्रारीनुसार याप्रकरणी सोशल मिडीयावर बदनामीकारक मजकूर प्रसारित करणे, फोटोत छेडछाड तसेच धमकाविल्याप्रकरणी दोन व्हॉटसअॅप खातेधारक अज्ञात व्यक्तीविरूध्द माहिती तंत्रज्ञान अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाचा तपास पो.नि. बी.डी. जगताप हे करीत आहेत.