जळगाव : बिडगाव (ता.चोपडा) येथे वादळामुळे तुटलेल्या वायरला स्पर्श झाल्याने एका प्रौढ व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लतिफ ईदबार तडवी (४७) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे अनेक भागात विविध घटना घडत असून, वीज पुरवठा देखील खंडित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील बिडगाव येथे लतिफ ईदबार तडवी (४७) आपल्या कुटूंबासह वास्तव्याला होते. गावात मिळेल ते मोलमजुरीचे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.
दरम्यान, आज मंगळवारी पाऊस सुरु असल्याने ते घरीच होते. तडवी हे घरातील वीज पुरवठा बंद पडल्याने झाडाजवळ गेले असता, त्यांना तुटलेला वायरच्या धक्का बसला.
घडलेला प्रकार ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर लतीफ तडवी यांना लागलीच जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केले.
डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत जळगाव येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तडवी यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, पत्नी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
दरम्यान, रावेर तालुक्यात जोरदार पावसामुळे पाच घरे तर एका मजुराच्या घरासह पावणे दोन लाख रुपये वाहून गेल्याची घटना सोमवारी घडली. आज मंगळवारी रावेर तालुक्यातील दोधे येथे वीज कोसळल्याने पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.