जळगाव : चाळीसगाव शहरात भेसळयुक्त दूध आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दूध डेअऱ्यांवर प्रशासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांमार्फत बुधवार ९ रोजी छापे टाकण्यात आले. यात सुमारे १३०० लिटर दूध नष्ट करण्यात आले.
चाळीसगाव शहरातील स्टेशन रोडवरील नामांकित दूध व दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्या आस्थापनांवर तसेच दूध सागर मार्ग परिसरातील दूध डेअऱ्यांवर छापा टाकण्यात आला. सदर कारवाई अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त स. कृ. कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त शामकांत पाटील, उपनियंत्रिक वजन माप शास्त्र विभागाचे बि. जी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा दुग्धविकास अधिकारी वाय. आर. नागरे यांच्या पथकात संतोष कांबळे व इतर विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी केली आहे.
भेसळयुक्त दूध नष्ट
दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गठीत केलेल्या भरारी पथकाने दूध डेअरी व दूध संकलन केंद्रांमधून दुधाच्या नमुन्यांची तपासणी केली. या तपासणीत अनेक ठिकाणी पाणी मिश्रित भेसळयुक्त दूध आढळून आले. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या भरारी पथकाने १ हजार ३८२ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केले आहे. मात्र भेसळयुक्त दूध आढळलेल्या डेअरी मालकांवर आस्थापनांवर कुठली कारवाई करण्यात आली; याची माहिती अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेली नाही.
दुधात हानिकारक केमिकल नाही
दूध व दुग्धजन्य पदार्थांची भेसळ रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गठीत केलेल्या पथकाने चाळीसगावातील डेअऱ्यांवर छापे टाकले. या कारवाईमध्ये अनेक ठिकाणी भेसळयुक्त दूध आढळून आले. दुधात प्रमाणापेक्षा जास्त पाणी आढळून आले. मात्र या दुधात युरिया किंवा अन्य केमिकल पदार्थ आढळले नसल्याचे प्रथमदर्शी दिसून आले आहे. परंतु दुधात मिश्रित केलेले पाणी कसे आहे, पाण्याची गुणवत्ता काय?असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहे.