जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे रासयनिक खतांच्या वापरामुळे खरीप हंगामातील पेरणी केलेल्या धान्यांचे नुकसान झाले असून याबाबत तक्रारी शासनास प्राप्त झाल्या होत्या. त्यावर आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मंत्री गिरीश महाजनांच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जळगाव तालुक्यातील वडली येथे कृषी केंद्रास भेट देऊन सदरील रासायनिक खतांची विक्री बंदची नोटीस देऊन खताचे नमुने संकलित करण्याचे आदेश देऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली.
दरम्यान, कोणतीही कंपनी अथवा विक्रेता शेतकऱ्यांची फसवणूक करताना आढळल्यास अशा सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना कृषी विभागास दिल्या असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नुकसानग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करून अहवाल २४ तासात दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
पावसाळी अधिवेशनात कायदा होणार
शेतकऱ्यांची बोगस बियाणे व खतामुळे होत असलेल्या फसवणुकीची पोस्ट राज्य शासनाने गांभीर्याने घेतली असून या अनुषंगाने १६ जुलैच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत जळगाव जिल्ह्यासह राज्यभरामध्ये बोगस बियाणे बोगस खतामुळे शेतकऱ्यांचे होणाऱ्या नुकसानी संदर्भात विषय उपस्थित झाला असून बोगस बियाणे व खतवाटप करणाऱ्या कंपन्याविरुद्ध कठोर कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असून याकरिता कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेले असून पावसाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर होणार असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.