जळगाव : कौटुंबिक वाद आणि दारू पिण्याच्या व्यसनातून पित्याने पोटच्या मुलीची बांभोरी पुलाखाली हत्या केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यात निर्दयी पित्याला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने आज दुपारी अडीच वाजता आजन्म कारावासी शिक्षा सुनावली. संदीप यादव चौधरी (३६) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रानुसार, शहरातील हिराशिवा पार्क येथे संदीप हा पत्नी नयना आणि मयत मुलगी कोमल चौधरी (७) यांच्यासह वास्तव्याला होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. सतत दारूच्या नशेत राहत होता. ८ जानेवारी २०२० रोजी सकाळी दारू पिण्यावरून पत्नी नयना चौधरी यांना मारहाण केली होती. त्याचवेळी मुलगी कोमलने “पप्पा मम्मीला मारून नका” असे सांगितले. याचा राग संदीपच्या मनात होता. दरम्यान, दुपारी ४ वाजता नयना चौधरी यांनी मुलगी कोमल हिला शिकवणीला सोडले. त्यानंतर संदीप चौधरी हा शिकवणीतून चिमुकलीला परस्पर सोबत घेवून गेला.
जळगाव शहरानजीक बांभोरी पुलाच्या खाली तिचा खून केला होता. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला जळगाव जिल्हा न्यायलयाचे न्यायमुर्ती एम.क्यू.एस.एम शेख यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. यात सरकार पक्षातर्फे एकुण १२ साक्षिदार तपासण्यात आले. साक्षिदार आणि सादर केलेल्या पुराव्या आधारे न्यायमुर्ती शेख यांनी आरोपी संदीप चौधरी याला दोषी ठावून आजन्म कारावास आणि ५ हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड.सुरेंद्र काबरा करीत आहे.