Jalgaon News : भूईमुगाच्या शेंगांना विक्रमी भाव!

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत शेंगांना हंगामात सर्वाधिक प्रतिक्विंटल रूपये ८३५० असा विक्रमी भाव मिळाला आहे. बाजार समितीचे सचिव जगदीश लोधे यांनी बुधवार, १२ रोजी एका पत्रकान्वये प्रसिद्धीस दिले आहे.

जळगाव जिल्ह्यातील भुसार मालासाठी प्रसिद्ध असलेली चाळीसगाव बाजार समिती कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच दर शनिवारी भरणारा येथील गुरांचा बाजार देखील प्रसिद्ध आहे. सुमारे २०० कोटींची उलाढाल असलेल्या या बाजार समितीमध्ये ज्वारी, बाजरी, मका, गहू, हरभरा आदी शेतमालाबरोबरच शेंगा या शेतीमालाचा लिलाव देखील केला जातो.

एकेकाळी शेंगा या शेतीमालासाठी येथील बाजार समिती प्रसिद्ध होती. परंतु काळानुरूप शेती पिकांमध्ये बदल होत गेले आणि शेंगांची आवक कमी झाली. कांदा कापूस या नगदी पिकांकडे शेतकरी बांधवांचा कल वाढला. परंतु कांदा व कापूस या नगदी पिकांचीही हमी नसल्यामुळे काही शेतकरी बांधव शेंगा हे पीक घेतात. त्यापासून गुरांना पाला मिळतो, म्हणजेच गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटतो.

दरम्यान, बुधवार, १२ रोजी बाजार समितीमध्ये शेंगा या शेतमालाला चालू हंगामातील विक्रमी प्रतिक्विंटल ८३५० रुपये भाव मिळाल्याने शेतकरी राजा आनंदी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तालुक्यातील शेतकरी बांधवांनी भुईमूग शेंगा शेतीमाल बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड व संचालक मंडळाने केले आहे.