तरुण भारत लाईव्ह l राहुल शिरसाळे l जळगाव जिल्हाभरात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत महसूल प्रशासनाने पाच महिन्यात तब्बल दोन कोटी अकरा लाख ८३ हजार ५२७ रूपयांची कमाई केली आहे. याबाबत ५९ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३९७ वाहनांवर कारवाई केली आहे. यात एकूण ११२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. असे असतानाही जिल्हाभरातून विविध मानि वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे.
वाळूचे लिलाव नसतानाही वाळूची चोरी होत होती. लिलाव नसल्याने प्रशासनाचा मोठा महसूल बुडत होता. लिलाव नसलेल्या नदीपात्रातून वाळू व्यावसायीक रात्रभरात वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा करत होते. अशा वाळू चोरांना पकडण्यासाठी पोलिस व जिल्हा प्रशासन कारवाईही करत होते. मात्र मुजोर वाळू व्यावसायिक कारवाई करण्यास आलेल्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही जीवघेणे हल्लेही करत होते.
वाळूची चोरी वाळू व्यावसायीक एका पावतीवर अनेक वाहने भरून वाळूची खुलेआम चोरी करत होते. हे कमी की काय छत्रपती संभाजीनगर, धुळे, जालना, बुलढाणा, नाशिक येथील पावतींवर जळगाव जिल्ह्यातून वाळूची चोरी करत होते.
दंड ५ कोटीचा, वसुली मात्र दोन कोटी ११ लाखाची
एप्रिल ते ऑगस्टपर्यंत ५ कोटी ६५ हजार ९२० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तर २ कोटी ११ लाख ८३ हजार ५२७ रुपये वसुल करण्यात आले आहेत. दंडात्मक कारवाईनंतर १८३ वाहनांना सोडण्यात आले आहे. ५९ गुन्ह्यात ११२ आरोपी अटकेत जिल्ह्यात ५९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वाधिक गुन्हे जळगाव तालुक्यात २७ गुन्ह्यात ५३ जणांना अटक केली आहे. जिल्ह्यात एकूण ११२ जणांना अटक करण्यात आली आहे.दरम्यान, वाळूची अवैध वाहतुक करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर जिल्ह्यात हल्ले होण्याच्या घटना देखील घडल्या. यात ४ कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला आहे.
वाळूची अवैध करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई देखील करण्यात आली. यात सर्वाधीक जळगाव तालुक्यात ४५ वाहने जप्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकूण २१४ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
कारवाईत चाळीसगाव, जळगाव, अमळनेर आघाडीवर
अवैध वाळू वाहतुकीत चाळीसगाव, अमळनेर व जळगाव तालुके आघाडीवर आहेत. एकट्या चाळीसगाव तालुक्यात ७० वाहनांवर तर जळगाव तालुक्यात ६४ वाहनांवर तर अमळनेर तालुक्यात ४५ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. धरणगाव २८ एरंडोल २६, पाचोरा ३२, भडगाव २८, यावल २४. भुसावळ २३, चोपडा १३ मुक्ताईनगर १०. रावेर १९. जामनेर ७, पारोळा ६ येथे वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
अन शासनाने घेतला निर्णय
राज्यभरातील वाळू बाबत अशीच स्थिती असल्याने शासनाने वाळूचे धोरण ठरवत सर्व वाळू जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली प्रशासनाकडून विकण्याचे ठरविले.
पाच महिन्यात केली कारवाई
असे असतांनाही जिल्ह्यातून वाळूची चोरी होत आहे. त्यामुळे अवैध वाळूवर पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने कारवाईचे सत्र सुरू केले. १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट २३ या पाच महिन्यांच्या कालावधीत वाळूची चोरटी वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर, डंपरवर कारवाई केली. यात तब्बल ३९७ वाहनांना ५ कोटी ६५ हजार ९२० रूपयांचा दंड ठोठविण्यात आला. तर २ कोटी ११ लाख ८३ हजार ५२७ रूपये वसुल करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत आदेश
जिल्ह्यात वाळूची अवैध वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यातच जिल्हाधिकारीपदी आयुष प्रसाद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वाळूची माफीयांविरोधात धडक कारवाईचे आदेश दिले.
बोदवडला २ वाहनांवर कारवाई
जिल्ह्यात बोदवडला सर्वाधिक कमी म्हणजे २ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.