Jalgaon News : मासे पडण्यासाठी गेले अन् अडकले, एसडीआरएफच्या पथकाला करण्यात आले पाचारण

जळगाव : गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातही पावसाने जोर धरला असून, मासे पडण्यासाठी गेलेला आणि त्याला काढण्यासाठी गेलेला, असे दोन जण पुराच्या पाण्यात अडकल्याची घटना अमळनेरच्या बोदर्डे येथे घडली आहे. दरम्यान, धुळे येथील ‘एसडीआरएफ’च्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

राज्यात गेल्या चार दिवसांपासून पावासाचा धुमाकूळ सुरु आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक शहरांमधील पाणी वस्त्यांमध्ये घुसले आहे. नद्यांनी धोक्याची पातळी गाळली आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नदी काठावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. काही धरणांचे दरवाजे उघडण्यात आहे. एकंदरीत राज्यातील पावसाचा मोठा परिणाम जनजीवनावर झाला आहे.

जळगाव जिल्ह्यातही पावसाने जोर धरला आहे; अशातच अमळनेर तालुक्यातील बोदर्डे येथे संजय राजेंद्र भिल हा मासे पकडायला गेला. मात्र, नदीत पाण्याच्या प्रवाह वाढल्याने तो पाण्यातच अडकला. त्याला काढण्यासाठी काशीनाथ प्रकाश भिल हा गेला. दरम्यान, पांझरा नदीला पूर आल्याने तोही अडकला आहे.

या घटनेबाबत उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला कळवले आहे. त्यानुसार धुळे येथील एसडीआरएफ पथक पाचारण करण्यात आले आहे.