Jalgaon News : राष्ट्रवादीला खिंडार; भाजपमध्ये वाढले ‘इनकमिंग’

जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी भुसावळ भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केल्यानंतर शहरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. मूळ भाजपातच कार्यरत असलेले हे पदाधिकारी आमदार एकनाथराव खडसे यांच्यावरील निष्ठेनंतर डिसेंबर २०१९ मध्ये राष्ट्रवादीत गेले होते, मात्र राष्ट्रवादी सोडून त्यांनी सोमवार, २८ रोजी पुन्हा भाजपात प्रवेश केला. आमदार संजय सावकारे यांनी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचे भाजपचे • मफलर देवून स्वागत केले.

भाजपमध्ये वाढले ‘इनकमिंग’
माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, माजी नगरसेवक अॅड. बोधराज चौधरी, माजी नगरसेविका शोभा नेमाडे यांचे पुत्र दिनेश नेमाडे, माजी नगरसेविका शैलजा नारखेडे यांचे पती पुरुषोत्तम नारखेडे व अनिकेत पाटील यांनी आमदार संजय सावकारे यांच्या सुरभी नगरातील कार्यालयाबाहेर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात सोमवारी सायंकाळी भाजपात प्रवेश केला. यावेळी उपस्थितांनी आमदार संजय सवकारे व भाजपाचा जयघोष केला. यापूर्वी माजी नगरसेवक किरण कोलते व माजी नगरसेविका मेघा वाणी यांचे पती देवा वाणी यांनीदेखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली होती. आमदार खडसे यांचे कट्टर समर्थकच आता राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत असल्याने भुसावळात राष्ट्रवादीसाठी ही बाब धक्कादायक मानली जात आहे.

पालिका निवडणुकांना अवकाश मात्र राजकीय वातावरण तापले
आमदार एकनाथराव खडसे व आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात झालेल्या २०१६ मधील पालिका निवडणुकीत भाजपने पालिकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले होते मात्र भाजपातील अंतर्गत कलहानंतर खडसेंनी भाजपला रामराम करीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शहरातील राजकीय समीकरणेही बदलली, तर भाजपमधून खडसेंवरील निष्ठेपोटी अनेकांनी निवडणूक कालावधी आटोपताच डिसेंबर २०२१९ मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला, मात्र आगामी वर्षभरांनी होणाऱ्या निवडणुका पाहता भाजपला अनुकूल वातावरण असल्याने भाजपमध्ये अलीकडे इनकमिंग वाढले आहे. भुसावळात निवडणुका स्वबळावर होतात की आघाडी होते? याचे उत्तर काळ देणार असलातरी इच्छुकांना आतापासूनची तयारी पूर्ण केली आहे.

यांची होती उपस्थिती
पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशप्रसंगी भाजप शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, युवराज लोणारी, किरण कोलते, राजेंद्र नाटकर, अजय नागराणी, सतीश सपकाळे, बापू महाजन, संतोष बारसे, मुकेश पाटील, पिंटू ठाकूर, निकी बत्रा, प्रा. प्रशांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ते कार्यकर्ते भाजपचेच आमदार
भाजपात प्रवेश केलेले पदाधिकारी हे पूर्वी भाजपतच होते व सर्वांचे विचार आधीपासून भाजपशी जुळत असल्याने त्यांनाही भाजप सोडून करमत नव्हते. राष्ट्रवादी पक्षात काम करणेही वा त्या पक्षाच्या विचारधारेशी त्यांची मत जुळत नसल्याने त्यांनी पुन्हा भाजपात परतण्याचा निर्णय घेतला. सर्वांना सोबत घेऊनही शहराचा विकास साधण्यात येईल, असे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.