जळगाव : कौटुंबिक वादात समेट घडविण्यासाठी आलेल्या जळगावच्या शिवसेना शिंदे व ठाकरे गटाच्या दोन महिला पदाधिकारी थेट कोर्ट चौकात आपसांत भिडल्या. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला नसून मात्र, या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पारोळा तालुक्यातील मुलीचे लग्न जळगाव शहरातील एका तरुणासोबत झाले आहे. लग्नातून दांपत्याला अडीच वर्षाचे आपत्य आहे. कौटुंबिक वादामुळे दोघे विभक्त झाले आहेत. त्या दोघांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी मुलीकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या आणि मुलाकडून उद्धव ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आल्या होत्या.
महिला दक्षता समितीतून प्रकरण बाहेर पडल्यावर जिल्हा न्यायालय चौकात एका वकिलाच्या कार्यालयात मुलीकडील मंडळी सल्ला घेण्यासाठी जात असताना, मुलाकडील मंडळींनी त्यांना चौकातच गाठले. दहा हजार रुपये घेऊन तडजोड करून घ्यावी, असे त्यांना सांगितले.
त्यावरून शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. त्यामुळे कोर्ट चौकात वाहतूक कोंडी झाली. त्या दांपत्यांमध्ये समेट होण्याऐवजी विषय घटस्फोटापर्यंत पोचला. काही साध्या वेशातील वकिलांनी वाद थांबविला.