Jalgaon News : शेती कामासाठी आले अन् वीज कोसळली, प्रकृती गंभीर

जळगाव : वीज पडल्याने पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना रावेर तालुक्यात घडलीय. जखमींना तात्काळ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. अशातच आज मंगळवारी रावेर तालुक्यातील दोधे येथे वीज कोसळल्याने पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

मीराबाई प्रताप जमरे (३०), पूजा प्रताप जमरे (१३), रेखाबाई खरते (३०), कालू खरते (३०) आणि ज्योती चंद्रसिंग रावत (३२) असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

हे कुटुंब मूळचे मध्यप्रदेशातील झिरण्या येथील रहिवासी असून उदरनिर्वाहासाठी रावेर तालुक्यातील दोधे येथे शेतीच्या कामासाठी आले होते.

प्राथमिक उपचारानंतर जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरले आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.