जळगाव : हतनूर ता. भुसावळ धरणांचे सर्व ४१ दरवाजे आज उघडले आहेत. मंगळवारी रात्री धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला. यानंतर आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आज दुपारच्या सुमारास धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत. यामुळे तापी नदीला पुर आला आहे.
जळगाव जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाची संततधार सुरू आहे. शिवाय तापी व पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे तापी व पूर्णा नदीच्या पाणी पातळीत २१०.५० मीटरने वाढ झाली आहे. एकूण साठा १९८ दलघमी असून हतनुर धरणात येणाऱ्या येव्यानुसार टप्प्या टप्प्याने एकूण साठा ५१.०३ टक्के धरण भरले आहे. यामुळे हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. यामुळे सायंकाळी ५ वाजेला सद्यस्थितीत पाहून हतनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण उघण्यात आले आहेत.
नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
धरणाचे दरवाजे उघण्यात आल्याने यातून ३८८२ क्युमेक्स १३७०९३ क्युसेक्स घ.मी.प्र.से. एवढा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे. यामुळे नदीला मोठा पुर आला आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तापी नदी पात्रात जाऊ नये तसेच गुरेढोरे व मनुष्यप्राणी यांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये तसेच आवश्यक खबरदारी घेण्यात यावी; असे आवाहन प्रशासनाच्यावतीने केले आहे.