jalgaon politacal : उन्मेष पाटील यांची राजकीय मुत्सद्देगिरी की राजकीय आत्महत्या…!

चंद्रशेखर जोशी
jalgaon politacal : खासदार उन्मेष पाटील यांनी अखेर भाजपतून बाहेर पडत ‌‘शि…उबाठा’ गटात प्रवेश केला. ही त्यांची राजकीय मुत्सद्देगिरी की राजकीय आत्महत्या… असा प्रश्न राजकीय क्षेत्रात केला जात आहे. त्यांचा उबाठा गटात प्रवेश, मित्र करण पवारांना उमेदवारी मिळवून देणे यामागे त्यांच्यातील धुर्त राजकारणी समोर येत असून, या परिस्थितीमुळे भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांना फायदाच होणार असल्याचेही लक्षात येते.

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर उमेदवारी कुणाला याबाबत मोठी उत्सुकता होती. जिल्ह्यात जळगाव व रावेर असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांचे प्रयत्न होते. जळगाव लोकसभा मतदारसंघात अखेर माजी आमदार व पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळाली. गत काळात त्यांच्यावर अन्याय झाला होता, याची भरपाई पक्षानेच करून दिली. 2019 ला त्यांना उमेदवारी मिळाली व पक्षाने अगदी शेवटच्या क्षणी त्यांची उमेदवारी रद्द करून उन्मेष पाटील यांना संधी दिली. यावर्षी त्याविरूद्ध झाले. उन्मेष पाटील यांना पुन्हा संधी न देता पक्षाने स्मिता वाघ यांना पुढे केले, मात्र या निर्णयामुळे उन्मेष पाटील नाराज होते. ते बंड करणार म्हणून गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. बुधवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यांनी शिवसेना उबाठा गटात प्रवेश करत स्वत: निवडणुकीला सामोरे न जाता आपले मित्र पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना पुढे केले व त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळवून दिली.

ही तर राजकीय आत्महत्या…
भाजपने उन्मेष पाटील यांना यापूर्वी भरपूर संधी दिली आहे, हे नाकारून चालणार नाही. 2014 मध्ये फारशी राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांना पक्षाने विधानसभेसाठी उमेदवारी देऊन निवडून आणले. त्यानंतर लोकसभेसाठी अचानक उमेदवारी दिली व निवडून आणले. गत पाच वर्षाकडे दृष्टीक्षेप टाकला असता उन्मेष पाटील हे काय फक्त चाळीसगावचे खासदार आहेत काय? असा प्रश्न पडत होता. हिच पक्षांतर्गत नाराजी यावेळी त्यांना भोवली. मतदारसंघातील अन्य विधानसभा मतदारसंघात त्यांचा संपर्क शून्य होता. त्यामुळे त्यांचा भाजपतून बाहेर पडण्याचा निर्णय राजकीय आत्महत्याच ठरणार आहे.

करण पवारांचा दिला बळी
करण पवार हे मूळचे भाजपतील कधीच नव्हते. त्यांची कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी ही काँग्रेस-राष्ट्रवादी धार्जिनी होती व आहे. केवळ भाजपची सर्वत्र लाट असल्याने ते या पक्षात आले व काही काळ स्थिरावले. त्यांनाही लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून संधी मिळाली व पक्षांतर्गत जबाबदारीही होती. उन्मेष पाटील यांचे ते खास मित्र. मात्र मित्राचाच बळी दिला जातोय असे या घटनाक्रमावरून लक्षात येते. भविष्यात चाळीसगावमधून विधाससभेची उन्मेष पाटील यांना उमेदवारी शक्य नाही. त्यामुळे उबाठा गटाला अट घालत त्यांनी लोकसभेची माळ करण पवारांच्या गळ्यात टाकली. खासदारकीला कोण निवडून येणार आहे हे उन्म्ोष पाटील यांना चांगले माहिती आहे त्यामुळे लोकसभेसाठी लढत देण्याचे त्यांनी टाळले. त्यामुळे त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा करण पवार हे बळी पडले आहेत हेच खरे.

निवडण्याची संधी नेमकी कुणाला…

आता खरी लढत ही भाजपच्या स्मिता वाघ व उबाठा गटाचे करण पवार यांच्यात आहे. यात उन्मेष पाटील यांची ताकद किती हे त्यांनाच ठाऊक. स्मिता वाघ यांच्या पाठीशी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यासह मोठे पक्षबळ आहे. यासह त्यांच्या बाबतीत एक सहानुभूती मतदारसंघात आजही आहे. याबरोबरच ‌‘मोदी मॅजिक’ भल्याभल्यांना माती चारणार आहे, हेदेखील देवढेच खरे. त्यामुळे निवडण्याची खरी संधी कुणाला हे सांगण्याची कोणत्याही भविष्यकाराची गरज नाही. परिणामी उन्मेष पाटील यांची ही राजकीय मुत्सद्देगिरी की राजकीय आत्महत्या हे येता काळाच ठरविणार आहे.