Jalgaon politicel : उमेदवारी दिली नाही म्हणून एका रात्रीतून पक्ष बदलविणे आपल्या रक्तात नाही. मला सुद्धा ठाकरे गटाची ऑफर होती पण आपण ती नाकारली आपण पक्षास प्रथम प्राधान्य देत असल्याचे मत माजी खासदार ए.टी. पाटील यांनी गुरूवारी येथे व्यक्त केले.
माजी खासदार ए.टी. पाटील , ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भाजप निवडणूक कार्यालयात भेट दिली. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. मी भाजपचा दहा वर्षे खासदार होतो. गेल्या वेळी मला उमेदवारी दिली नाही पक्ष पक्षाच्या सक्रिय राजकारणात आपण होतो. उमेदवारीसाठी आपणही इच्छूक होतो पण शेवटी पक्षाने ठरविले ती व्यक्ती उमेदवार असते.
स्मिता वाघ यांच्या उमेदवारीवर नाराज नाही
स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्याने आपण नाराज होता असे विचारले असता ते म्हणाले, माझी कोणतीही नाराजी नाही. उमेदवारी मागितली होती ती मिळावी ही अपेक्षा चुकीची नाही. ज्या पक्षाने आपल्याला दोनदा खासदारकी दिली, यावेळी नकार दिला म्हणून एका रात्रीतून पक्ष बदलविणे हे आपल्या रक्तात नाही. ठाकरे गटाची ऑफर होती पक्ष बदलविणे आपल्या बुद्धीला न पटणारे आहे. स्मिता वाघ यांच्या प्रचारात आपण सहभागी होणार काय? असे विचारले असता पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडू असे त्यांनी स्पष्ट केले.
ना. गिरीश महाजन यांच्याशी चर्चा
दरम्यान, ए.टी. पाटील यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. दोघांमध्ये बंदद्वार चर्चा झाली. यावेळी भाजपच्या जळगाव लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार स्मिता वाघ यादेखील होत्या.