जळगाव । जळगाव जिल्ह्यात मागील तीन दिवसात झालेल्या परतीच्या पावसामुळे काढणीवर आलेल्या मका, कापूससह इतर धान्य पिकांचे मोठं नुकसान झालं असून यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान जिल्ह्यावरील परतीच्या पावसाचे संकट कायम असून आज देखील हवामान खात्याने जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला. यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे.
आज सोमवारी हवामान खात्याने जिल्ह्याला मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे दिवसभरात कधीही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. ऑक्टोबरपासून तापमानात कमालीची वाढ झाल्याने उकाड्यासह तीन्न उन्हाचा सामना करावा लागत आहे. तापमान ३६ अंशांपर्यंत पोहोचले आहे; परंतु आता तीन दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू झाल्याने हवामान खात्याने जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे.
तसेच मंगळवारीही जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसामुळे उकाडा कमी झाला असून, २३ तारखेपासून पुन्हा वातावरणात बदल होणार आहे. दरम्यान या पावसामुळे वेचणीवर आलेला कापूस, ज्वारी, बाजरी व भाजीपाला वर्गीय पिकांचे नुकसान होत आहे. वेचणीवरील कापूस ओला होऊन तो काळवंडण्याचे व पिवळा पडण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी शेतकऱ्यांनी तो विक्रीला काढल्यास त्याला भाव कमी मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आता पावसाने उघडीप देण्याची प्रतीक्षा आहे.