जळगाव : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १८ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार करून गर्भवती केले. त्यानंतर गर्भपात करून लग्नास नकार दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडीस आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर १८ वर्षाची पीडित तरुणी ही आपल्या कुटुंबियांसह जळगावात राहत होती. तिच्याशी एरंडोल शहरातील हसन असलम मोमीन याची ओळख झाली, त्यावेळी ती अल्पवयीन होती. संशयित आरोपीने ओळखीचा फायदा घेत तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिच्या इच्छेविरूध्द तिच्यावर अमानुष अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत तरूणी गर्भवती राहिली. पिडीता गर्भवती राहिल्यानंतर संशयित आरोपी हसन असलम मोमीन, त्याची आई मुन्नी आणि असलम मोमीन या तिघांनी गर्भपात करण्यासाठी कॉफी आणि पपई खाऊ घातली. यामुळे तिचा गर्भपात झाला. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्याची तारीख निश्चीत केली. परंतू लग्नाच्या वेळी हजर झाले नाही व पीडितेची फसवणूक केली.
हा प्रकार घडल्यानंतर तरूणीने रविवारी १२ मार्च रोजी रात्री ११ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी हसन असलम मोमीन, त्याची आई मुन्नी आणि असलम मोमीन या तिघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.