जळगाव । जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा कमालीचा वाढला असून राज्यात उष्णतेची लाट आल्याचे जाणवत आहे. दरम्यान, जळगावला रविवारी यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. आगामी चार दिवस तापमानात अजून वाढ होण्याचा अंदाज असून १० मे नंतर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे.
जळगावात सध्या सूर्याचा प्रकोप पाहायला मिळत आहे. वाढत्या उष्णतेमुळे उकाड्यात मोठी वाढ झाली. सकाळपासूनच अंगातून घामाच्या धारा वाहत आहे. सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत असल्याने जळगावकर हैराण झाला आहे. गेल्या काही दिवसापासून जळगाव शहरासह जिल्ह्यातील तापमानात वाढ होताना दिसत आहे.
यातच काल रविवारी जिल्ह्यात तापमानाने उच्चांक गाठत ४३.६ अंशांची नोंद झाली. यंदाचे हे सर्वाधिक तापमान समजले जात असून आगामी चार दिवस तापमानात अजून वाढ होण्याचा अंदाज आहे. मात्र यानंतर उष्णतेपासून जळगावकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
९ मे पर्यंत जिल्ह्यात तापमानाचा पारा ४३ ते ४४ अंशांपर्यंत राहू शकतो. मात्र, त्यानंतर १० मे नंतर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे. सलग काही दिवस तापमानाचा पारा वाढल्यानंतर समुद्रावरील पाणी तापते, यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते व पावसाची स्थिती निर्माण होते. जिल्ह्यात १० मे ते १४ मे दरम्यान काहीअंशी पाऊस होऊ शकतो. तसेच ढगाळ वातावरणदेखील कायम राहण्याचा अंदाज आहे. यामुळे जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळू शकतो.