---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, चार दिवसांत एकूण ३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रविवारी रात्रीही जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस झाला, ज्यात एकूण १३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
विशेषतः एरंडोल, जामनेर, पाचोरा आणि भडगाव या चार तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. जळगाव, चाळीसगाव तालुक्यांतही चांगला पाऊस झाला. येत्या दिवसात थंडी पडणार असल्याचा अंदाज आहे.
गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी धरणातून १४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गिरणा नदीचे पात्र भरून वाहत असून, गेल्या तीन महिन्यांपासून नदी दुथडी भरून वाहत आहे. यासह मन्याड धरणातून देखील १ हजार ते २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
थंडी आता ३१ ऑक्टोबरनंतरच…
जिल्ह्यात अजून ३० ऑक्टोबरपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर मात्र, हवामान कोरडे होणार आहे. कोरड्या हवामानामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रीय होऊन जिल्ह्यात थंडीचे जोरदार आगमन होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.









