आठवडाभर किमान तापमानात सातत्याने घसरण झाल्यानंतर शनिवारी सलग दुस-या दिवशी पारा चढल्याने वातावरण आल्हाददायक असले तरी हिल स्टेशनसारखी थंडी नाहीय.
बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे वाऱ्याच्या पॅटर्नमध्ये झालेल्या बदलाचा परिणाम हवामानावर झाला आहे. सध्या जळगावसह राज्यावर आभाळमाया आली असून ऐन हिवाळ्यात राज्यात पावसाळ्याने घुसखोरी केली आहे.
राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला होता.
चार पाच दिवसापूर्वी जळगावात किमान तापमान १० अंशापर्यंत घसरले होते. मात्र यातच फेंगल चक्रीवादळाचा राज्यवार परिणाम झाला आहे. गुलाबी थंडी गायब झाली असून पावसाचा अंदाज आहे.
सोमवारी शहराचे कमाल तापमान २९.४ तर किमान तापमान १४.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. परंतु आता थंडीचा जोर कमी होईल. आज शहरात मंगळवारी ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे.
३ ते ५ डिसेंबर दरम्यान जिल्ह्यातील विविध ठिकाणी दुपारनंतर हलका पाऊस होईल. ६ ते ८ तारखेपर्यंत ढगाळ वातावरण असेल. ९ डिसेंबरनंतर किमान तापमानात घट होऊ शकते.