जळगाव : जळगावमध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका वाढू लागल्याने थंडी गायब झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ९ ते १७ फेब्रुवारीदरम्यान तापमानाचा पारा ३३ ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतो, तर किमान तापमान १३ ते १८ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे हवामानात रोज चढ-उतार होत आहेत. हवामान अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, १७ फेब्रुवारीपर्यंत आकाश निरभ्र राहणार असून, पहाटे सौम्य थंडी तर दुपारी प्रखर ऊन जाणवेल. गेल्या काही वर्षांपासून वसंत ऋतूचे दिवस झपाट्याने कमी होत असून, थंडीचा कालावधीही घटत आहे.
हेही वाचा : ‘घटस्फोट घेऊ’, म्हणत न्यायालय गाठलं अन् पत्नी आणि मुलांसमोरच… घटनेनं खळबळ
महाराष्ट्रासह देशभरातील अनेक भागांत तापमान वाढू लागले आहे. भारत हवामान विभागाचे (IMD) महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या सुरुवातीपासून उन्हाळ्याची तीव्रता वाढेल. यंदा वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात फेब्रुवारी महिन्यात सरासरीपेक्षा २०% कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तापमान वाढीमुळे गव्हाचे दाणे लहान राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. हरभरा आणि मोहरीची पिकेही वेळेपूर्वीच पिकतील. सफरचंद आणि लिचीच्या झाडांवर परिणाम होऊन फळे लवकर पिकण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत हवामान बदलांचा फटका कृषी उत्पादनावर होऊ शकतो.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जानेवारी २०२५ हा इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचा उष्ण महिना ठरला असून, जानेवारीत देशात ७०% कमी पाऊस पडला. डोंगराळ भागांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी ८०% ने कमी झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातही पावसाचा अंदाज कमीच असून, त्यामुळे पुढील तीन आठवड्यांत देशभरात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे.
काय करावे?
उन्हापासून बचावासाठी हलके आणि सुती कपडे वापरावेत.
पुरेशी पाणी पिण्याची सवय लावावी.
शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेती व्यवस्थापन करावे.
थंडी आणि उन्हाच्या बदलत्या प्रभावामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
तापमानातील अनियमित वाढ आणि कमी झालेला पाऊस ही हवामान बदलाची स्पष्ट लक्षणे आहेत. पुढील काही दिवस उन्हाची तीव्रता वाढणार असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.