जळगाव : मुलीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने ५३ वर्षीय महिलेला तब्बल १० लाख ५३ हजार ९५० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील नेहरूनगर परिसरात कल्पना आत्माराम कोळी (वय ५३) या मुलगी वैशाली कोळी हिच्यासोबत वास्तव्याला आहेत. दरम्यान, कल्पना कोळी यांची एका कार्यक्रमात नामे ज्योती अशोक साळुंखे (रा. मन्यारवाडा जळगाव) या महिलेशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर ज्योती साळुंखे हिने कल्पना कोळी यांचा विश्वास संपादन करत, मुलगी वैशालीला तहसीलदार म्हणून नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवले.
दरम्यान, यावर विश्वास ठेवून कल्पना कोळी यांनी ज्योती साळुंखे यांना एकूण ४ लाख २२ हजार रुपये रोख दिले. त्यानंतर आणखी पैशांची मागणी झाल्यावर कल्पना कोळी यांनी घरातील ३ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिनेही ज्योती साळुंखे यांना दिले.
तसेच ज्योती साळुंखे हीने वैशाली हिला शासकीय योजनेच्या अर्ज भरण्याच्या कामात गुंतवले. एका अर्जामागे १०० रुपये मिळतील, असे सांगून वैशाली यांच्याकडून तब्बल ५६० लोकांकडून अर्ज भरून घेतले आणि त्यापोटी जमा झालेले ३ लाख ५१ हजार ९५० रुपये स्वतः घेतले. अशा प्रकारे ज्योती साळुंखे हिने कल्पना कोळी आणि त्यांच्या मुलीकडून एकूण १० लाख ७३ हजार ९५० रुपये उकळले.
या प्रकरणी कल्पना कोळी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र तावडे करत आहेत.