जळगावकरांनो सावधान, तापमानात वाढ, या दिवसांपासून आणखी वाढ होण्याचे संकेत

तरुण भारत लाईव्ह । २० फेब्रुवारी २०२३ । जळगाव जिल्ह्यात उन्हाची चाहूल लागायला सुरवात झाली आहे. जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले असून, दुपारी उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहे. सातत्याने वाढत असलेल्‍या कमाल तापमान फेब्रुवारीच्‍या शेवटीच चाळिशी गाठण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

मागील काही वर्षात फेब्रुवारी महिन्‍याच्‍या अखेरपर्यंत हिवाळा लांबत असल्‍याने मार्चच्‍या मध्‍यंतरात उन्हाळा जाणवायला सुरवात होत होती. मार्चच्या सुरुवातीला तापमान ३५ अंशांपुढे जात असे; परंतु यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्याच आठवड्यात तापमानाने ३६ अंशांची पातळी ओलांडली. त्यामुळे उन्हाळा लवकर लागल्याचे जाणवत आहे.

दरम्यान, जळगाव जिल्‍ह्यात सध्या पारा ३७ अंशांवर आहे. या आठवड्यात चार ते पाच अंशाने तापमान वाढू शकते. कमाल तापमानात वाढ होऊन आठवड्याच्या शेवटी उन्हाची लाट येऊ शकते. रात्रीचे तापमान मात्र, १० अंशांवर असून थंडी वाजते आहे.