जळगाव : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक यांच्या आठवणी तसेच देशभक्तीची भावना जनमानसात कायम रुजावी, या उद्देशाने गतवर्षी १५ ऑगस्टला ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाला भारतीयांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
आपल्या देशाबद्दल असलेला अभिमान आणि स्वातंत्र्यदिनाचे स्मरण करण्यासाठी ही मोहिम यशस्वी झाल्यामुळे यंदाही ‘हर घर तिरंगा २.०’ मोहिम केंद्र आणि राज्याकडून राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नागरीकांना तिरंगा ध्वज विकत घेणे सुलभ व्हावे म्हणून भारतीय पोस्ट विभागात तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
यंदाही १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनासाठी टपाल विभागाकडून रु. २५/- प्रति ध्वज अशा किफायतशीर दराने दर्जेदार राष्ट्रीय ध्वजांची विक्री आणि वितरण करण्यात येत आहे. पोस्ट विभागाच्यावतीने, सरकारी/खासगी संस्था, कॉर्पोरेशन, स्थानिक स्वराज्य संस्थानी पोस्ट विभागाकडे त्यांच्या कार्यालयांसाठी आणि कर्मचार्यांसाठी राष्ट्रीय ध्वजाची आवश्यकता असल्यास जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये नोंदवावे, असे आवाहन पोस्ट खात्याकडून करण्यात आला आहे.