खुशखबर! दोन वर्षांची पाण्याची चिंता मिटली ; गिरणा, वाघूर ओव्हरफ्लो

---Advertisement---

 

जळगाव : जिल्ह्यासाठी यंदा पावसाळा सुखद ठरला आहे. जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे जलस्रोत असलेले गिरणा आणि वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सुमारे ७५ हजार हेक्टर शेतीला पाणी मिळणार असून, सिंचनाचा मोठा प्रश्न सुटला आहे. विशेषतः वाघूर धरणामुळे जळगाव शहर आणि जामनेर शहराचा दोन वर्षांसाठीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

जळगाव शहराला पाणीपुरवठा होणारा वाघूर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने मंगळवारी सकाळी ६ वाजता व नंतर १० वाजता पाण्याची आवक वाढल्याने प्रकल्पाचे २० दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून तब्बल ६५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मध्यम प्रकल्पापैकी बहुळा प्रकल्पाचे ९ दरवाजे उघडून तब्बल ६० हजार क्युसेकचा विसर्ग केला जात आहे.

६५ हजार क्युसेकचा विसर्ग

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी जळगाव शहरानजीक असलेल्या वाघूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत ४३८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि प्रकल्पातील जलपातळी ९९ टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. प्रकल्प सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रकल्पाचे २० दरवाजे ०.५० मीटरने उघडून ६५ हजार क्युसेकचा विसर्ग केला जात आहे.

गिरणा धरणातून १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

जिल्ह्याच्या ६ तालुक्यांमधील ५२ हजार हेक्टर शेतीसाठी वरदान असलेले गिरणा धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून सध्या १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाचोरा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा नदीला मोठा पूर आला आहे. नाशिक जिल्ह्यातील गिरणा पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्यामुळे धरणातून होणारा विसर्ग अजून वाढण्याची शक्यता आहे. यामुळे रब्बी हंगामासाठीही पुरेसे पाणी उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील ५२ हजार हेक्टर क्षेत्रावरील सिंचनाचा प्रश्न यंदा पूर्णपणे मिटला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---