तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात १४०० पेक्षा अधिक गावांमध्ये १३४२ योजनाना मंजुरी देण्यात आली आहे. या कामांना कार्यारंभ आदेश देऊन सहा महिन्याचा कालावधी उलटल्यानंतरही संबंधित योजनेच्या काम घेतलेल्या ठेकेदारांनी कामास सुरूवात केली नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे यांना या ठेकेदारांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले होते. यापूर्वीच जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या १७० मक्तेदारांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर सीईओंनी शुक्रवारी पुन्हा जल जीवन मिशनच्या मक्तेदारांची बैठक घेतली. त्यात ९ फेब्रुवारीपर्यंत काम सुरू न करणार्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. तसेच जलजीवन मिशनच्या बैठकीला गैरहजर असलेल्या कंत्राटदारांनाही नोटिसा पाठविण्याचे आदेश त्यांनी ३ फेब्रुवारी रोजीच्या आढावा बैठकीत पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिल्या. त्यामुळे जलजीवन मिशनच्या कामे मार्गी लावण्यासाठी जि.प.सीईओ सध्या ऍक्शन मोडवर भूमिका घेत असल्याचे दिसून येते. पाणीपुरवठा योजनांचे कामे पूर्ण करण्यासाठी सीईओंनी तत्परतेने अमंलबजावणीसाठी उपाययोजना केल्याने या कामांना वेग येणार आहे.
जलजीवन मिशनच्या कामे मार्गी लावण्यासाठी जि.प.सीईओ सध्या ऍक्शन मोडवर भूमिका घेत असल्याचे दिसून येते. पाणीपुरवठा योजनांचे कामे पूर्ण करण्यासाठी सीईओंनी तत्परतेने अमंलबजावणीसाठी उपाययोजना केल्याने या कामांना वेग येणार आहे.
टाकी अन् स्त्रोताच्या कामांसाठी आठवडाभराचा मक्तेदारांना अल्टीमेटम
१५फेब्रुवारीपर्यंत पाण्याच्या टाकीचे आणि स्त्रोताचे काम न झाल्यास मक्तेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिला. त्यामुळे ठेकेदारही धास्तावले आहेत. बैठकीत जल जीवन मिशनचे काम सुरू करतांना येणार्या अडचणीचा पाढा ठेकेदारांनी वाचला. स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतींकडून पाण्याच्या टाकीच्या जागेसाठी सहकार्य मिळत नसल्याची समस्या ठेकेदारांनी मांडली. त्यासाठी सीईओंनी संबंधित गावात योजना राबविण्यासाठी ग्रामसेवकाच्या माध्यमातून तालुक्यातील बीडीओंना यासंदर्भातील अडचणी सोडविण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी योजनांच्या कामांना गती येईल, असे आशादायी चित्र आहे. केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात १ हजार ४७८ योजना मंजुर करण्यात आल्या आहेत. कामांना प्रशासकीय मान्यता देवून कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. बर्याच योजनांना ८ ऑगष्ट व त्यानंतर वर्क ऑर्डर देण्यात आल्या असल्या तरी सहा महिन्यात ठेकेदारांनी कामाला सुरूवात केलेली नाही, याची दखल घेत कार्यकारी अभियंत्यांनी ठेकेदारांना यापूर्वीच नोटिसा बजावल्या आहेत.
टंचाईची पार्श्वभूमी असलेल्या गावांमध्ये पाणी योजनांना गती
जिल्ह्यातील काही गावांमध्ये उन्हाळ्यात टँकरची गरज भासते. अशा टंचाईची पार्श्वभुमी असलेल्या गावांमध्ये तातडीने पाणी योजनांना गती देण्याचे काम ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी हाती घेतले आहे. त्यात जिल्हभरात जल जीवन मिशन अंतर्गत पाणी योजनांच्या कामांना गती देण्यात येत आहे. हिवाळा संपल्याने उन्हाळ्याची चाहूल लागणार आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यात यंदा बहुतांश तालुक्यातील गावांमध्ये टंचाई स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने जि.प.च्या पाणीपुरवठा विभागाचा प्रत्येक आठवड्याला सीईओ आढावा घेत आहे. परिणामी सीईओंचा सुरू असलेला नियमितच्या पाठपुराव्याने पाणी योजनांची कामेही मार्गी लागत आहे.
उद्घाटनासाठी राजकीय तारखेची प्रतिक्षा !
जिल्ह्यातील पाणी योजनांना गती मिळावी यासाठी जि.प.च्या पाणी पुरवठा विभाग आणि प्रशासाने कामकाजात गती आणली. मात्र या योजनांच्या शुभारंभासाठी उद्घाटन मुहूर्त अन् राजकीय तारखेच्या प्रतिक्षेमुळे खोळंबल्याचे दिसून येते. या योजनेच्या शुभारंभासाठी ज्येष्ठ नेत्यांची प्रतिक्षा आणि तारीख मिळण्यासाठी होत असलेल्या अडचणीमुळे पाणी योजनाचा श्रीगणेशा करण्यासाठी उशिर होत असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक परिसरातील आमदार आणि त्यांचे वरिष्ठ नेते यांची उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती असावी, यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने उद्घाटन कार्यक्रम लांबतो. परिणामी संबंधित योजनेच्या ठेकेदारास काम सुरू करता येत नसल्याची परिस्थिती आहे.
स्थानिक अडचणीमुळे पाणी योजनांना खोळंबा..
जल जीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणी योजनांचे कामे करतांना त्यात गावातील स्थानिक अडचणीमुळे खोळंबा होत असल्याचे सांगण्यात आले. त्यात ग्रामपंचायतींकडून योजनेसह पिण्याच्या पाण्याची टाकी बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देण्यास विलंब होत असल्याने योजनांची कामे लांबल्याचे समजते. बहुतांश गावांमध्ये टाकीची जागा निश्चितीबाबतच्या संभ्रमावस्थेमुळे या योजनेच्या कामांचा शुभारंभ होत नसल्याचे चित्र आहे. उन्हाळा सुरू होत असल्याने पाणी योजनांची कामे तातडीने होेणे अपेक्षित आहे. स्थानिक अडचणी सोडविण्यासाठी बीडीओंना या बैठकीनंतर सीईओंनी सूचना केल्या. संबंधित गावांमधील ग्रामसेवकांच्या समन्वयाने यातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.